Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. युक्रेनवर आक्रमण करणारा रशिया आता एका निर्णायक वळणावर युद्धाचा पवित्रा घेत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी रशियाने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किववर क्रूर हल्ला केला. एवढेचं नाही तर खार्किव शहराची प्रशासकीय इमारत अवघ्या दोन सेकंदात क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्ध्वस्त केली. इमारतीवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून जगभरातून त्याचा निषेध होत आहे. रशियन सैन्याकडून प्रशासकीय आणि निवासी इमारतींवरही हल्ले केले जात आहेत, जे युद्ध आणि मानवी हक्कांच्या नियमांच्या विरुद्ध मानले जात आहे.
खार्किवचे प्रमुख ओलेग सेंगुबोव्ह यांनीही रशियन हल्ल्यात प्रशासकीय इमारत कोसळल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की, रशियन हल्ल्याचा आज सहावा दिवस असून आता प्रशासकीय आणि निवासी इमारतींवरही रशियाकडून हल्ले होत आहेत.
सेंगुबोव्ह म्हणाले की, रशियाने खार्किववर GRAD आणि क्रूझ क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला केला आहे. हा युद्धगुन्हा आहे. पण आमचे सैन्य उभे आहे आणि रशियाशी जोरदार मुकाबला केला जात आहे. खार्किव व्यतिरिक्त रशियन सैन्याने राजधानी कीवलाही वेढा घातला आहे. युक्रेनची राजधानी कीववर रशियाकडून कधीही हल्ला होऊ शकतो, असे बोलले जात आहे. (वाचा - Ukraine Russia Crisis: रिपोर्टरने रशिया-युक्रेन संकट 6 भाषांमध्ये केले कव्हर; सोशल मीडियावर व्हायरल होताय 'हा' व्हिडिओ)
सध्या कीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन सतत वाजत आहेत. संपूर्ण शहर जवळपास रिकामे आहे. महिला, मुले आणि वृद्ध पळून गेले आहेत, तर मोठ्या संख्येने तरुण रशियन सैन्याशी स्पर्धा करण्यासाठी शहरात थांबले आहेत. उपग्रह प्रतिमांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, रशियाचा 64 किमी लांबीचा लष्करी ताफा कीवच्या दिशेने जात आहे. हा काफिला कीवपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे. अशा स्थितीत कीववर कधीही प्राणघातक हल्ला होऊ शकतो.
Video of a reported Russian Missile Strike on The Kharkiv Regional Administration Building about 30 minutes ago at 8am, there was Heavy Damage to the
Building and Multiple Civilian Casualties are being reported. pic.twitter.com/2HHawQQBnZ
— OSINTdefender (@sentdefender) March 1, 2022
भारतीय दूतावासाचे देशवासीयांना आवाहन -
दरम्यान, देशात उपस्थित असलेल्या भारतीयांनी कोणत्याही मार्गाने राजधानी सोडावी, असे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे. ऑपरेशन गंगा राबवून लोकांना भारतातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे 10,000 लोक भारतात पोहोचले आहेत. यापैकी 1500 लोकांना भारत सरकारच्या विमानांद्वारे आणण्यात आले आहे. इतकेचं नाही तर भारतीय हवाई दलाला केंद्र सरकारने लोकांना बाहेर काढण्यास सांगितले आहे.