Coronavirus वर उपचार म्हणून वृद्ध दांपत्याने केले डोनाल्ड ट्रंप यांनी दावा केलेल्या औषधाचे सेवन; पतीचा मृत्यू, पत्नीची स्थिती गंभीर
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी सर्व देशांनी कडक बंदोबस्त केला आहे. मात्र अनेक उपाययोजन करूनही हा आजार थांबायचे नाव घेत नाही. अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर, देशातील बरीच मोठी शहरे बंद केली गेली आहेत आणि लोकांना आपल्या घरातच राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली असून, यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी ट्रंप यांनी काही दिवसांपूर्वी काही औषधांचा दावा केला होता, तीच औषध घेतल्याने ही व्यक्ती मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावर तोड सापडल्याचा दावा केला होता. ट्रंप यांनी ट्वीट करत सांगितले होते की, मलेरियाविरोधी औषध क्लोरोक्विन (Chloroquine Phosphate) हे कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरले जाऊ शकते. ट्रम्प यांच्या बोलण्यावरून ऍरिझोना (Arizona) मधील एका वयोवृद्ध जोडप्याने वैद्यकीय सल्ल्याशिवाय या औषधाचे सेवन केले. या गोष्टीचा परिणाम म्हणजे, त्यानंतर यातील पतीचे निधन झाले व पत्नीला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. कोरोनावर उपचार करण्यासाठी अमेरिका लस आणि औषध तयार करण्याच्या प्रयत्नांत आहे. अशात अध्यक्ष ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करत, हायड्रोक्लोरोक्विन आणि अझिथ्रोमाइसिन ही दोन औषधे सुचवली होती. (हेही वाचा: इंग्लंडच्या राजघराण्यात Coronavirus चा शिरकाव; प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण; स्कॉटलंड येथे सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार)

डेली मेलच्या वृत्तानुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या जोडप्याने फिशटँक साफ करण्याचे केमिकल प्यायले. नवरा-बायकोला वाटले की हे तेच औषध आहे ज्याचा उल्लेख ट्रंप यांनी केला होता. केमिकल प्यायल्यानंतर नवरा-बायकोची तब्येत बिघडू लागली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले, जिथे पती मरण पावला. या घटनेचे उदाहरण देत अनेक आरोग्याविषयक संस्था लोकांना जागरूक राहण्याचे सांगत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये असे स्पष्ट सांगण्यात येत आहे.