Disney ने थीम पार्क मधील 28000 कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता; कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा मोठा निर्णय
Disney Theme Park (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस संकटाच्या (Coronavirus Pandemic) पार्श्वभूमीवर अमेरिकेतील (America) मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध डिस्ने (Disney) कंपनीने थीम पार्कमधील (Theme Park) तब्बल 28,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. थीम पार्क मधील 28000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांश असल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ कर्लिफोर्निया (California) आणि फोर्लिडा (Forida) राज्यात डिस्नेचे 110,000 कर्मचारी आहेत. या निर्यणानंतर केवळ 82000 कर्मचारी थीम पार्कमध्ये राहतील.

"हा निर्णय घेणे खूप कठीण होते. परंतु, कोविड-19 संकटामुळे व्यवसायाचे झालेले नुकसान पाहता हा एकमेव पर्याय आमच्याकडे होता. सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी पर्यटकांची क्षमता मर्यादीत करावी लागणार आहे. तसंच कोरोना व्हायरसचे संकट अजून किती काळ चालेल, याचा अंदाज बांधता येणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे," अशी माहिती डिस्नेचे चेअरमन Josh D'Amaro यांनी न्यूयॉर्क टाईम्सची बोलताना दिली आहे.

जुलै महिन्याच्या मध्यापासून फ्लोरिडा मधील डिस्नीवर्ल्ड पर्यटकांसाठी काही प्रमाणात सुरु करण्यात आले आहे. परंतु, कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीमुळे या थीमपार्कला भेट देणाऱ्यांच्या संख्येत खूप मोठी घट दिसून येत आहे. न्युयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या युनियन सोबत डिस्ने कंपनी चर्चा करणार आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाचा सर्वाधिक फटका अमेरिकाला बसला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना बाधितांच्या संख्येत अमेरिका प्रथमस्थानी आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,180,411 वर पोहचला असून आतापर्यंत 205,774 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Coronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO)

कोविड-19 संकटावर मात करण्यासाठी अमेरिकेसह जगातील अनेक देशात लसीच्या चाचण्या सुरु आहेत. दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सन कंंपनीची कोरोनावरील लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती.