PM Modi Address Parliament of Ghana (फोटो सौजन्य - Twitter)

PM Modi Address Parliament of Ghana: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या घानाच्या (Ghana) दौऱ्यावर आहेत. 30 वर्षांनंतर घानाला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान बनले आहेत. बुधवारी घाना येथे पोहोचल्यानंतर राष्ट्रपती महामा यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनरसह 21 तोफांची सलामी देण्यात आली. दरम्यान, घानाच्या संसदेला (Ghana's Parliament) संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी घानाच्या भाषेत नमस्ते म्हणताच, सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले.

यावेळी भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आज या प्रतिष्ठित सभागृहाला संबोधित करताना मला खूप अभिमान वाटतो. घाना ही अशी भूमी आहे जी लोकशाहीच्या भावनेने ओतप्रोत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्रतिनिधी म्हणून मी 1.4 अब्ज भारतीयांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा माझ्यासोबत घेऊन आलो आहे. घानाकडून मिळालेल्या सर्वोच्च सन्मानाबद्दल मी 140 कोटी भारतीयांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो.' (हेही वाचा -Gaza Ceasefire Deal: इस्रायलकडून 60 दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावास सहमती; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती)

भारतासाठी लोकशाही व्यवस्था नाही तर एक संस्कार आहे

दरम्यान, घानाच्या संसदेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत लोकशाहीची जननी आहे. भारतासाठी, लोकशाही ही एक व्यवस्था नाही तर एक संस्कार आहे. भारतात 2 हजार 500 राजकीय पक्ष आहेत. 20 वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या राज्यात सरकार चालवत आहेत. यामुळेच भारतात येणाऱ्या लोकांचे भारतात भव्य स्वागत केले जाते. जेव्हा आम्ही घानाकडे पाहतो तेव्हा आपल्याला एक राष्ट्र दिसते जे धैर्याने उभे आहे. सर्वसमावेशक प्रगतीसाठी तुमच्या वचनबद्धतेमुळे घाना संपूर्ण आफ्रिकन खंडासाठी खरोखरच प्रेरणा केंद्र बनले आहे.

पंतप्रधान मोदींनी घानाच्या संसदेत उपस्थित केला दहशतवादाचा मुद्दा -

घानाच्या संसदेला संबोधित करताना मोदींनी दहशतवादावर भाष्य केले. मोदी म्हणाले की, दहशतवाद हा एक मोठा मुद्दा आणि जगासाठी एक मोठी समस्या आहे, त्याचबरोबर हवामान बदल हा देखील एक मोठा मुद्दा आहे. आज भारत विकासाचा एक नवीन अध्याय लिहित आहे. हे इतके आनंददायी सहकार्य आहे की आफ्रिका भारताच्या अनेक गौरवशाली क्षणांशी जोडलेला आहे. जेव्हा भारताचे चंद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरले तेव्हा मी भारतात होतो, आज जेव्हा भारताचा एक अंतराळवीर मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळात आहे, तेव्हाही मी आफ्रिकेत आहे.