Hawai WIld Fire

अमेरिकेतील (US) हवाई राज्यातील जंगलातील आग (Hawaii wildfire) भीषण होत आहे. या आगीत आतापर्यंत 67 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आग विझवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असले तरी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. आगीमुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. याशिवाय शहरातील 1000 हून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. (Plane Emergency Landing Video: हलक्या विमानाचे रस्त्यावर आपत्कालीन लँडींग, पाहा व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, आगीमुळे लाहौना शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन म्हणाले की, विनाशानंतर 16 लाख लोकसंख्या असलेल्या लाहौना शहराची पुनर्बांधणी करण्यासाठी अनेक वर्षे आणि कोट्यवधी रुपये लागतील. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी निधी जारी केला आहे. आगग्रस्त भागातून आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अनेक पर्यटकांचाही समावेश आहे.

अमेरिकेच्या हवाई प्रदेशातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. या आगीत एक हजाराहून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. त्याचबरोबर राज्यात अनेक लोक बेघर झाले आहेत. या आगीत अमेरिकेतील सर्वात मोठा आणि 150 वर्षे जुना वटवृक्षही जळून खाक झाला. यापूर्वी 1961 मध्ये समुद्राच्या लाटेत 61 जणांचा मृत्यू झाला होता.