Czech Republic Firing: चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात बेछूट गोळीबार, 15 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी
Gun Shot | Photo Credit - Pixabay

चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री बेछूट गोळीबारात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी असून त्यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. महत्वाचे म्हणजे ज्याने गोळीबार केला तो देखील मरण पावला आहे. चेक पोलीस आणि शहराच्या बचाव सेवेने गुरुवारी याबाबत माहिती दिली. सरकारी यंत्रणांकडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फुटेजमध्ये विद्यार्थी गोळीबारातून पळताना दिसत आहेत. हल्लेखोर नेमका कोण होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (हेही वाचा - Mass Shooting in Prague: प्रागमध्ये विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार; 11 ठार, 24 हून अधिक जखमी)

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी हल्लेखोराला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता. मात्र रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. जन पलाच स्क्वेअर येथे मध्य प्रागमधील चार्ल्स युनिव्हर्सिटी फॅकल्टी ऑफ आर्ट्समध्ये ही घटना घडली. या ठिकाणी अधिकारी तैनात करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार कॉलेजचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर विद्यार्थी नाताळच्या सुट्टीत जाणार होते. गोळीबार करणारा हा एकटा नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यासोबत आणखी काही जणही असू शकतात.