Covid-19 Vaccine Update: FDA कडून लसीच्या मंजूरीसाठी मॉडर्ना कंपनीकडून अर्ज; कोरोना बाधित काही रुग्णांमध्ये लस 100% परिणामकारक असल्याचा कंपनीचा दावा
Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीची कोविड-19 वरील लस आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळावी यासाठी आज अर्ज करण्यात आला. नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार ही लस कोविड-19 संसर्गावर 94.1% परिणामकारक असल्याचे दिसून आले. तर काही प्रौढ रुग्णांमध्ये ही लस 100% प्रभावी असल्याचे निर्दशनास आले आहे.  मॉडर्ना कंपनी आणि अमेरिका सरकारची राष्ट्रीय आरोग्य संस्था ही एकत्रिपणे ही लस विकसित करत आहे. (COVID-19 Vaccine Update: मॉडर्ना कंपनीच्या कोविड-19 लसीचे सकारात्मक परिणाम; प्रायोगिक तत्त्वावर लस लॉन्च करण्यासाठी सज्ज)

कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी जगभरात विविध लसींची निर्मिती सुरु आहे. त्यापैकी सकारात्मक परिणाम दाखवणारी मॉडर्ना बायोटेक फर्मची लस अमेरिकेत अग्रेसर आहे. या लसीच्या मंजूरी मिळवण्यासाठी मॉडर्ना कडून आज अर्ज दाखल करण्यात आला. युनाडेट स्टेस्ट फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनकडे या लसीच्या आपात्कालीन वापरासाठी आम्ही परवानगी मागत आहोत, असे मॉडर्ना कंपनीने सांगितले. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील निकालांनुसार ही लस कोविड-19 विरुद्ध 94.1 टक्के यशस्वी असल्याचे दिसून आले आहे.

ही लस काही रुग्णांमध्ये 100% प्रभावी असल्याचा दावा मॉडर्ना कंपनीने केला आहे. या लसीचा प्रभाव सर्व वयोगटातील आणि पुरुष, महिलांमध्ये समान आहे. मसल पेन, डोकेदुखी यांसारखे लहान सहान दुष्परिणाम वगळता या लसीचे दुसरे कोणतेही मोठे चिंतेचे कारण नाही.

आम्हाला विश्वास आहे की ही लस कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये खूप महत्त्वाचे शस्त्र ठरेल आणि लसीमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतील, अशी माहिती मॉडर्ना कंपनीचे सीईओ Stéphane Bancel यांनी दिली. या लसीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी सहभाग घेतलेल्या हजारो स्वयंसेवकांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ही लस यशस्वी करण्यासाठी क्लिनिकल ट्रायल्सच्या केंद्रावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे देखील मी आभार मानतो. तसंच ही लस बनवण्यासाठी आम्हाला मदत केलेल्या NIH, NIAID, BARDA या कंपन्यांचे देखील आम्ही आभार मानतो.

या लसीच्या सातत्याने येणारे सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन मॉडर्ना कंपनीने FDA समोर लसीच्या आपात्कालीन वापरासाठी मागणी केली आहे. या लसीला मंजूरी मिळताच ही लस लवकरच बाजारात येऊ शकेल.

मॉडर्ना लसीचे युरोप, कॅनडा, युके, इज्राईल आणि सिंगापूर या देशांमध्ये सुद्धा चाचण्या सुरु असून तेथे देखील लसीचे यशस्वी परिणाम समोर येत आहेत. WHO च्या आपात्कालीन यादीत स्थान मिळवण्यासाठी मॉडर्ना कंपनीची धडपड सुरु आहे.