COVID-19 Vaccine Update: Pfizer-BioNTech लसीच्या वितरणाला ख्रिसमस 2020 पूर्वी सुरुवात होण्याची शक्यता
Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

Pfizer Inc आणि BioNTech यांच्या लसीच्या शेवटच्या टप्प्यातील निकालांनुसार ही लस कोरोना व्हायरस (Coronavirus) वर 95% परिणामकारक असून याचे कोणतेही प्रतिकूल परिणाम नाहीत, अशी माहिती लस विकसकांनी बुधवारी दिली. या लसीमुळे अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये डिसेंबर 2020 पर्यंत लस उपलब्ध होऊ शकते. दरम्यान, या लसीबद्दल सकारात्मक माहिती म्हणजे सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास या लसीचे वितरण ख्रिसमस 2020 (Christmas 2020) पूर्वी सुरु होण्याची शक्यता आहे. (Pfizer COVID-19 Vaccine: फायझरची कोरोना व्हायरस लस 95 टक्के प्रभावी; आपत्कालीन मंजुरीसाठी तयार)

बायोएनटेकचे चीफ एक्झिक्युटीव्ह Ugur Sahin यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, "सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास डिसेंबरच्या पूर्वाधापर्यंत अमेरिकेकडून लसीसाठी मंजूरी मिळेल आणि ख्रिसमसपूर्वी लसीच्या वितरणाला सुरुवात होईल. पण हे होण्यासठी सर्व गोष्टी सुरळीत होणे गरजेचे आहे."

या लसीची सकारात्मक गोष्ट म्हणजे या लसीचा परिणाम लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांवर सारखाच होता. या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी युएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेडरकडून परवानगी मिळू शकते, अशी माहिती Ugur Sahin यांनी रॉयटर्सला दिली.

मॉर्डना ने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या निकालाअंती ही लस 94.5% परिणामकारक असल्याचे दिसून आले. सध्या आपल्याकडे दोन सुरक्षित आणि सकारात्मक परिणाम देणाऱ्या लसी उपलब्ध आहेत आणि लवकरच FDA कडून परवानगी मिळताच या लसी वितरणासाठी काही आठवड्यातच तयार होतील, अशी माहिती युएसचे आरोग्य व मानव सेवा सचिव अ‍ॅलेक्स अझर यांनी दिली आहे.

कोविड-19 बाधित पहिला रुग्ण 17 नोव्हेंबर 2019 रोजी चीन मधील वुहान शहारात आढळून आला होता. त्यानंतर हळूहळू कोरोनाचा संसर्ग अनेक देशांमध्ये पसरला आणि गेल्या 7-8 महिन्यांपासून या संकटाने जगभरातील बहुतांश देशांना ग्रासले आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे अनेक देशांचे, नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे यावरील लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच Pfizer-BioNTech लसीच्या या सकारात्मक बातमीमुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.