Coronavirus: कोरोना व्हायरसचा जगभरात हाहा:कार; स्पेनमध्ये गेल्या 24 तासात 514 जणांचा मृत्यू
Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना व्हायरसने चीननंतर इटली, इराणमध्ये धुमाकूळ घातला असून आता स्पेनमधील (Spain) नागरिकांची चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसमुळे स्पेन मध्ये गेल्या 24 तासात 514 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 40 हजारांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे स्पेनमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले असून सध्या नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत 16 हजाराहून नागरिकांची मृत्यू झाला आहे. तर तब्बल 4 लाखाच्या जवळपास लोकांना याची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या 180हून अधिक देश कोरोना व्हायरसशी लढा देत आहेत. पंरतु, अद्याप कोरोना प्रतिबंधक औषधाचा शोध न लागल्याने मृतांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत स्पेनमध्ये एकूण 2 हजार 696 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चीन, इटली, इराणनंतर आता स्पेनमध्ये मृतांच्या संख्या वाढू लागली आहे. संपूर्ण जग गेल्या 3 महिन्यांपासून कोरोना व्हायरसवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या चीन येथे मृतांच्या संख्येत घट झाली असून तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजत आहे. मात्र, इटली, इराण आणि स्पेनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पेनमध्ये तब्बल 40 हजार लोक कोरानाबाधीत झाले आहेत. यात 5 हजार 400 आरोग्य सेवा देणारे कर्मचारी आहेत. युरोपमध्ये इटलीनंतर स्पेनमध्ये कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. आतापर्यंत इटलीने सर्वाधिक 6 हजार मृत्यूची नोंद केली आहे. महत्वाचे म्हणजे माद्रिद, कॅटालोनिया आणि बास्क देश कोरोनाबाधीत लोकांचे केंद्र बनली आहेत. तर, इतर भागातही कोरोनाचे संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहेत. इटली आणि स्पेन या दोन्ही देशात वृद्धांची संख्या अधिक असल्याचे समजत आहेत. हे देखील वाचा- कोरोना व्हायरसमुळे येणारी आर्थिक मंदी ही 2009 पेक्षा भयानक असू शकते; IMF चीफ यांचा धोक्याचा इशारा

चीन, इटली, इराण आणि स्पेनसह भारतही कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतात मृतांची संख्या कमी असली तरीदेखील हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 500 अधिक लोकांना याची लागण झाली आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.