Anthony Fauci (Photo Credits: Getty Images)

भारतामध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेचा संसर्ग हाहाकार माजवत आहे. 22 एप्रिलपासून देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. 1 मे रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात कोरोना रुग्णसंख्येने 4 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. आता कोरोना इन्फेक्शन साखळी थांबविण्यासाठी बिडेन प्रशासनाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि साथीचे तज्ज्ञ डॉ अँथनी फौसी (US Epidemiologist Anthony Fauci) यांनी भारताच्या परिस्थितीबाबत काही सूचना केल्या आहेत. फौसी यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारतामध्ये लॉकडाऊन (Lockdown) लागू करणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला आहे.

डॉ. फौसी म्हणतात, लॉकडाऊनमुळे या कठीण परिस्थितीत भारताला त्वरित पावले उचलण्यास वेळ मिळेल. तसेच त्यांनी तातडीने लसीकरण करण्यावरही भर दिला. डॉ. फौची यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारत या वेळी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याची गरज आहे.

डॉ अँथनी फौसी म्हणाले की, ‘कोणत्याही देशाला लॉकडाउन नको आहे, परंतु कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी भारतात त्वरित लॉकडाउन लादणे आवश्यक आहे. भारतातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सरकारने प्रथम क्रायसिस ग्रुप किंवा मध्यवर्ती संघटना स्थापन केली पाहिजे, जी परिस्थितीला समजून घेऊन अत्यावश्यक गोष्टी लवकर आयोजित करेल.’ डॉक्टर फौसी यांनी लोकांचे लसीकरण पूर्ण करणे फार महत्वाचे आहे व ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधांचा अभावही त्वरित दूर करावा असेही सांगितले. (हेही वाचा: चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांचे PM Narendra Modi यांना पत्र; कोरोना विषाणू साथीशी लढण्यासाठी देऊ केली मदत)

या कामात इतर देशांसह जागतिक आरोग्य संघटनेची मदत घेतली जाऊ शकते असे ते म्हणतात. ते पुढे म्हणाले, ‘मी टीव्हीवर पाहत आहे की, भारतामध्ये रुग्णालयांची स्थिती अत्यंत खराब आहे. लोक मोठ्या संख्येने रूग्णालयाबाहेर गर्दी करत आहेत. अशावेळी युद्धपातळीवर रुग्णालये उभारली गेली पाहिजेत. यासाठी त्यांनी चीनचे उदाहरण दिले. चीनमध्ये लॉकडाऊन दरम्यान काही आठवड्यांत तात्पुरती रुग्णालये उभी केली होती. अशाप्रकारे रुग्णालये उभारण्यासाठी अमेरिकेच्या धर्तीवर सैन्याची मदत घेतली जाऊ शकते.