अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) नवीन नियम लागू करून गर्भनिरोधक औषधांच्या (Contraception) विक्रीवर बंदी घातली आहे. तालिबानने गर्भनिरोधक औषधांच्या वापरला मुस्लिमांची लोकसंख्या रोखण्याचे पश्चिमी देशांचे षडयंत्र म्हटले आहे. गर्भनिरोधक विकणाऱ्या दुकानदारांवरही बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप आहे. या सर्वांशिवाय सुईणींनाही कोणत्याही प्रकारची गर्भनिरोधक औषधे लिहून देऊ नयेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्समध्ये काही लोकांच्या निवेदनांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यांना तालिबानी सैनिकांकडून गर्भनिरोधक न विकण्याबाबत धमकी देण्यात आली होती. काबूलमधील एका मेडिकल स्टोअरच्या मालकाच्या म्हणण्यानुसार, गर्भनिरोधक न विकण्याची धमकी देऊन बंदूकधारी त्याच्या दुकानात घुसले. काबूलमधील प्रत्येक दुकानात, मेडिकल मध्ये तालिबानी सैनिक तपासणी करत असल्याचे दुकानदार सांगतात. (हेही वाचा: अमेरिका पुन्हा गोळीबाराने हादरली; मिसिसिपीमध्ये रॅपिड फायरिंगमध्ये 6 जणांचा मृत्यू)
एका वयोवृद्ध सुईणीने आरोप केला की, तिला तालिबान कमांडरकडून धमकावण्यात आले असून, तिच्यावर पाश्चात्य सभ्यतेचा प्रचार केल्याचा आरोप करत तिला बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्या तालिबानचा हा हुकूम फक्त काबूलमध्येच नाही तर मजार-ए-शरीफसारख्या इतर शहरांमध्येही लागू आहे. पाश्चात्य देशांची नक्कल करू नका, असा इशारा देत गर्भनिरोधकांच्या बंदीसाठी तालिबानी सैनिक रस्त्यावर गस्त घालत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तालिबानच्या या निर्णयाला फक्त अफगाण जनतेचाच विरोध आहे. अफगाणिस्तानातील आणि सध्या ब्रिटनमध्ये असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या शबनम नसीमी यांनी तालिबानच्या या निर्णयाचा कुराणशी संबंध जोडला आहे. कुराणात कुठेही गर्भनिरोधकावर बंदी नाही, त्यामुळे तालिबानचा हा निर्णय योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर महिलांवर अनेक प्रकारची बंधने लादण्यात आली आहेत. या निर्बंधांमध्ये त्यांच्या कपड्यांपासून त्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. या निर्णयांना विरोध करणाऱ्यांना तालिबान कठोर शिक्षा देत आहे.