Condoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले,  तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा
Condom | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात वापरलेले मास्क काही प्रक्रिया करुन पुन्हा विकल्याची घटना आपलयाकडे उघडकीस आली. या वेळी अनेकांनी हा प्रकार किळसवाणा असल्याचे म्हटले. पण किळसवाणा हा शब्दही थिटा पडेल अशी आणखी एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. काही विकृतांनी स्वत:च्या फायद्यासाठी चक्क वापरुन झालेले कंडोम धुवून विकले (Condoms Washed and Resold) आहेत. होय, व्हिएतनाम पोलिसांनी (Vietnam Police) या धक्कादायक प्रकाराचा छडा लावला आहे. इतकेच नव्हे तर हा प्रकार करणाऱ्यांच्या गोदामातून पोलिसांनी तब्बल 3 लाख 24 हजार वापरलेले कंडोम (Condom) जप्त केले आहेत.

वापरलेले कंडोम भरलेल्या तब्बल 12 गोणी

व्हिएतनाममधील सरकारी वृत्तवाहिनीसह इतरही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. आमचे सहकारी न्यूज पोर्टल लेटेस्टली डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार हा प्रकार व्हिएतनाम मधील दक्षिण प्रांतातील बिन्ह दुओंग जवळच्या एका गावात घडला. या गावातील एका गोदामात वापरलेले कंडोम भरलेल्या तब्बल 12 गोणी आढळल्या. या गोणींचे वजन जवळपास 360 किलो इतके होते. ज्यात 3 लाख 24 हजार कंडोम मिळाले. पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेलाही ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा, Lockdown: कंडोम घ्या मगच Quarantine सेंटरमधून घरी जा; बिहारमधल्या आरोग्य विभागाचा उपक्रम)

अज्ञात व्यक्तींकडून आरोपींना कंडोम पुरवठा

पोलिसांनी तपास करताना गोदाम मालकाचा जबाबद घेतला. या जबाबात गोदाम मालकाने सांगितले की, हे गोदाम आपण भाड्याने दिले होते. एक अज्ञात व्यक्ती आरोपींना वापरलेल्या कंटोमची बॅग प्रत्येक महिन्याला आणून देत असे. आरोपी या बँगचा साठा या गोदामत करत असत. (हेही वाचा, Expired Condom Side Effects: सेक्स दरम्यान कालबाह्य झालेले कंडोम वापरल्यास शरीरावर होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम)

लाकडी लिंगाच्या आधारे कंडोमला आकार

दरम्यान, पोलिसांनी ज्या महिलेला ताब्यात घेतले त्या महिलेने सांगितले की, वापरलेले कंडोम उकळत्या पाण्यात टाकले जायचे. त्यानंतर हे कंडोम पूर्ण सुकवले जात. एक लाकडी लिंग वापरुन त्याद्वारे कंडोमला आकार दिला जाई. पुढे या कंडोमला वंगण लाऊन त्याचे पॅकींग केले जात असे. पॅकींग केलेले कंडोम बाजारात विकले जात. आपल्याला कंडोमच्या वजनानुसार पैसे मिळत असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. दरम्यान, कंडोम उलाढालीतून आरोपींनी किती पैसे कमावले याबाबत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, व्हिएतनाम पोलिसांनी म्हटले आहे, कंडोम ही एक वैद्यकीय वस्तू आहे. या वस्तूचा गैरवापर अथवा त्याच्याशी छेडछाड करणे कायद्याने गुन्हा आहे. गोदाम मालक आणि आरोपींनी आतापर्यंत कायद्याचे किती उल्लंघन केले याबाबत तपास सुरु आहे. दरम्यान, हे कंडोम जवळच्याच गाव, शहरांतील दुकाने, हॉटेल्स, लॉज आदी ठिकाणी विकले जात असत असे स्थानिकांनी प्रसारमांध्यमांना माहिती देताना सांगितले.