जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर छुप्या रीतीने ड्रगचा पुरवठा (Drug Trafficking) करण्यात येतो. यासाठी या कटामध्ये सामील असणारे लोक पोलिसांपासून वाचण्यासाठी अनेक हटके युक्त्या वापरताना आढळले आहेत. आताही अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. कोलंबियन ड्रग कार्टेलने (Columbian Drug Cartel) अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी चक्क महिलांमध्ये द्रव कोकेनपासून बनवलेले ब्रेस्ट इम्प्लांट (Breast Implants) केले. मात्र या कार्टेलवर पोलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये सहभागी असणारी Los Cirujanos' ('The Surgeons') नावाची संस्था, Valle del Cauca च्या कोलंबिया विभागातील काली शहरात आणि अँटिओकिया विभागातील मेडेलिन शहरात दोन छापे मारून उध्वस्त करण्यात आली. डेलीमेलने याबाबत वृत्त दिले आहे.
या प्रकरणी एकूण, सहा पुरुष आणि चार महिलांना स्पेन आणि उर्वरित युरोपमध्ये अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यामध्ये मेडेलिन रूग्णालयाच्या प्रख्यात डॉक्टरचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक कॅली येथील रुग्णालयात तज्ज्ञ आहे आणि अटक झालेल्या दुसऱ्या व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने डॉक्टर असल्याचे भासवत पिडीत महिलांना स्पेनमधील नोकरीचे आमिष दाखवून त्यांची भरती करून घेतली.
या टोळीवर आरोप आहे की, त्यांनी अनेक महिलांची भरती केली आणि त्यांच्या स्तनांमध्ये द्रव कोकेन रोपण करण्यासाठी हॉटेल खोल्या किंवा भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमधील बेकायदेशीर शस्त्रक्रिया केल्या. या टोळीने ड्रग्सच्या तस्करीसाठी महिलांना सुंदर पाय बहाल करण्याच्या आमिषाने सिलिकॉन ऐवजी द्रव कोकेन वापरून काफ इम्प्लांट (Calf Implants) केले. (हेही वाचा: परदेशातून आलेल्या महिलेने पोटात लपवून आणले 5 कोटींचे कोकेन असलेल्या 80 कॅप्सूल्स, मुंबई विमानतळावर झाली अटक)
त्या महिलांना नंतर माद्रिद येथे पाठवण्यात आले जेथे या टोळीतील सदस्यांनी महिलांचे रोपण काढून टाकले. पीडितांनी सहसा काली येथील अल्फोन्सो बोनिला अरागॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोलंबियाची राजधानी बोगोटा येथील एल डोराडो लुईस कार्लोस गलन सरमिएंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून सध्या सर्व संशयितांना प्रतिबंधक कारागृहात पाठविण्यात आले आहे.