चीन (China) मधील एका किंडरगार्टेन शिक्षिकेला (kindergarten Teacher) न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षिकेने केलेल्या भयंकर कृत्यासाठी कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. एका सहकाऱ्याशी झालेल्या वादानंतर, तिने तब्बल 25 विद्यार्थ्यांना विष (Poison) देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या शिक्षिकेवर आहे. वांग युन (Wang Yun) असे या शिक्षिकेचे नाव आहे. वांग युनने केलेल्या विष प्रयोगामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे. शिक्षक वांग युनला हेनान प्रांताच्या जिओझू भागातून अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की सकाळी दलिया खाल्ल्यानंतर ही मुले आजारी पडली व त्यांना दवाखान्यात नेले गेले.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला शिक्षिकेचा तिच्या एका साथीदाराशी वाद झाला होता व त्याचाच बदला घेण्यासाठी तिने मुलांच्या नाश्त्यात सोडियम नायट्रेट मिसळले. गेल्या वर्षी 27 मार्च रोजी ही घटना घडली होती. स्थानिक गिअजू कोर्टाने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या व्यवस्थापनावरून वाद झाल्यावर महिला शिक्षकाने मुलांना विषबाधा केली. असे सांगितले जात आहे की, सोडियम नायट्रेट हे अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते, परंतु ते जास्त प्रमाणात दिले तर ते प्राणघातक ठरू शकते. (हेही वाचा: स्फोटाच्या आवाजाने हादरले पॅरीस; फायटर जेटने ओलांडली ध्वनीतीव्रतेची कमाल पातळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण)
मुलांना विध दिल्यावर 23 मुलांना उलट्या सुरु झाल्या व काही मुले बेशुद्ध पडली. त्यानंतर केलेल्या तपासणीत महिला शिक्षकाने 25 मुलांना विष दिल्याचे समोर आले. विषाची मात्रा शरीरात गेल्यानंतर आजारी पडलेला मुलगा 10 महिने जीवन-मृत्यूशी झुंज देत होता व अखेर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान याआधी 2017 मध्ये आपल्या पतीला विष दिल्याबाबतही वांग युनला दोषी ठरवण्यात आले होते. या घटनेनंतर तिचा पतीही आजारी पडला होता. अशा गंभीर गुन्ह्यासाठी वांग फाशीच्या शिक्षेस पात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. चीनमधील शाळांमध्ये शस्त्रे आणण्यावर पूर्णपणे बंदी आहे, ज्यामुळे सामूहिक हत्येसाठी विष देण्याचा प्रकार घडला आहे.