China Covid-19: चीनमध्ये पुन्हा येणार कोविड महामारी! आठवड्याला 6.5 कोटी प्रकरणे समोर येण्याची भीती
COVID | File Image

नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले होते की, जगात कोरोनापेक्षाही (Coronavirus) धोकादायक एक नवीन महामारी येऊ शकते. अशा व्हायरसचा धोका कोरोनापेक्षाही जास्त भयावह असू शकतो. डब्ल्यूएचओच्या या वक्तव्यादरम्यान चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दर आठवड्याला 6.5 कोटी प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. श्वसन विभागाचे तज्ज्ञ झोंग नाशन यांनी ही माहिती दिली आहे. ओमिक्रॉनच्या XBB सब-व्हेरियंटबाबत हा इशारा देण्यात आला आहे.

झोंग नशान म्हणतात की, चीनमध्ये व्हायरसची व्याप्ती सतत वाढत आहे. XBB प्रकारामुळे पुन्हा एकदा नवीन महामारी होऊ शकते. अशा परिस्थितीत विषाणूंबाबत अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या सध्या सुरू असलेल्या नवीन लाटेचा सामना करण्यासाठी चिनी अधिकारी कोविड लसींची मागणी करत आहेत. चीनमध्ये लागू करण्यात आलेले झिरो कोविड धोरण मागे घेतल्यानंतर रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अधिकृत मीडिया सूत्रांनी सांगितले की, XBB ऑमिक्रॉन सब व्हेरीएंटसाठी दोन नवीन कोरोना लसींना मान्यता दिली आहे. याशिवाय आणखी तीन ते चार लसींना लवकरच मंजुरी मिळणार असल्याची चर्चा आहे. अहवालानुसार, चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी मागे घेतल्यानंतर देशातील सुमारे 85 टक्के लोकसंख्या विषाणूच्या विळख्यात आली होती. येत्या काळात चीनमध्ये येणा-या जुन्या प्रकारातील व्हायरसच्या घटनांमध्ये घट होऊ शकते. (हेही वाचा: WHO Warn: कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार! WHO प्रमुखांनी दिला इशारा, 2 कोटी लोकांना गमवावा लागणार जीव)

सार्वजनिक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की, देशातील वृद्ध लोकांमधील मृत्यूदर वाढू नये म्हणून बूस्टर लसीकरण वाढवावे लागेल आणि हॉस्पिटलमध्ये अँटीव्हायरलसारखे उपाय सुरू करावे लागतील. यापूर्वी अमेरिकेतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती, मात्र 11 मे रोजी देशाच्या सरकारने आरोग्य आणीबाणी रद्द केली. दरम्यान, एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. अजय कुमार सांगतात की, कोरोनाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता व्हायरसचा पूर्वीसारखा धोका नाही. चीनमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र सध्या तरी असे काही घडण्याचा धोका नाही. त्यामुळे भारतातही घाबरण्यासारखे काही नाही. जेव्हा एखादा आतापर्यंत नोंद न झालेला नवीन प्रकार येईल तेव्हाच कोरोनाचा धोका निर्माण होईल.