A child wearing a mask to get protected from coronavirus. (Photo Credit: PTI)

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखाहून अधिक झाली आहे. तसेच आतापर्यंत 56 हजारा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरातील तज्ञांकडून विविध सल्ले दिले जात आहेत. अशातचं जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी मार्गदर्शक सुचना देण्यात येत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. अनेक देशांमध्ये मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं असून या सुचनेचं पालन न केल्यास हजारो रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. (हेही वाचा - When Will Coronavirus End: कोरोना व्हायरसचे संकट कधी संपणार? WHO च्या प्रमुखांनी दिले 'हे' उत्तर)

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. या सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही प्रौढांसारखे मास्क घालणे गरजेचे आहे. 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे या मुलांनी मास्क घालणं आवश्यक आहे.

याशिवाय ज्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. तसेच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, अशा ठिकाणी लहान मुलांनी मास्क वापरणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले प्रौढांप्रमाणे कोरोना पसरवू शकतात. याशिवाय 5 वर्षांखालील मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही, असंही तज्ञांनी म्हटलं आहे. 5 वर्षांखालील मुलांना कोरोनाचा धोका कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना मास्क घालणे बंधनकारक नाही, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

दरम्यान, जपानच्या पीडियाट्रिक असोसिएनशनने मागील आठवड्यात सांगितले होते की, दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्क धोकादायक ठरू शकतं. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घातल्यास त्यांना समस्या उद्भवू शकतात.