
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) कोविड-19 (COVID-19) असणाऱ्या तसेच, लक्षणे नसलेल्या अमेरिकन लोकांसाठी अलगीकरणात (Isolation and Quarantine) ठेवण्यासाठी शिफारस केलेला कालावधी कमी केला आहे. हा कालावधी 10 दिवसांवरुन पाच दिवसांवर आणला आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) सोमवारी जारी केलेल्या मार्गदर्शन आणि सूचनांनुसार ही पावले उचलण्यात आली. या सूचनांमध्ये सीडीसीने म्हटले आहे की, विलगीकरणात ठेवलेल्या ज्या लोकांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येईल त्यांना पुढील पाच दिवस मास्क वापरावा लागेल.
अमेरिकेत नव्याने आढळलेल्या कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णांमध्ये 73% रुग्ण हे आमायक्रोन संक्रमित असल्याचे सीडीसीने पाठमागच्या आठवड्यात सांगितले होते. सीडीसीने असेही म्हटले होते की, कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण झालेल्यांमध्येही कोरोना (ओमायक्रोन) संसर्ग वाढत आहे. ज्यांनी लसीचा तिसरा बुस्टर डोस घेतला आहे त्यांच्यात ओमायक्रोनची सौम्य लक्षणे आढळून येत आहेत.तर काहींना कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत.
दरम्यान, सीडीसीने 10-दिवसांच्या विलगीकरणात ठेवण्याचा कालावधी कमी केल्याने लक्षणे नसलेल्या लोकांना योग्य खबरदारी घेऊन कामावर किंवा शाळेत परत येण्यास मदत होईल असे, व्हाईट हाऊसचे वैद्यकीय सल्लागार अँथनी फौसी यांनी गेल्या आठवड्यात सीएनएनला सांगितले होते.
लसीकरण न केलेल्या किंवा त्यांच्या दुसऱ्या (mRNA) डोसपासून सहा महिन्यांहून अधिक काळ किंवा जॉन्सन अँड जॉन्सन लसीनंतर दोन महिन्यांहून अधिक काळ आणि अद्याप लसीकरण न झालेल्या लोकांसाठी सीडीसीने सोमवारी मार्गदर्शन केले. या वेळी सीडीसीने पाच दिवस अलग ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती आणि त्यानंतर आणखी सहा दिवस कठोर मास्क वापरण्याची शिफारस केली होती.
सीडीसीने पुढे म्हटले आहे की, ज्या व्यक्तींना लसीचा बूस्टर शॉट मिळाला आहे त्यांना क्वारंटाईन ठेवण्याची गरज नाही. मात्र त्यांना 10 दिवसांसाठी मास्क घालणे आवश्यक असल्याचे, सीडीसीने सांगितले.