कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव जगभर दिसून आला आहे. वेगवेगळे देश त्यांच्या पद्धतीने कोरोनाविरूद्ध लढा देत आहेत. ब्राझीलमध्येही (Brazil) कोरोनाला पराभूत करण्यासाठी कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे लोकांना आवाहन केले जात आहे. परंतु कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल एखाद्या अध्यक्षाला दंड आकारण्यात आल्याची आपण कल्पना करू शकता? कदाचित नाही. मात्र याच ब्राझीलमध्ये ही घटना घडली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात कोरोनाचे सुरक्षा नियम न पाळल्याबद्दल राष्ट्रपती जैर बोलसोनारो (Jair Bolsonaro) यांना दंड भरावा लागणार आहे.
मारान्होचे (Maranhao) राज्यपाल फ्लाविओ डिनो यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्याच्या आरोग्य सुरक्षा नियमांचे पालन न केल्याबद्दल बोलसोनारो यांना दंड भरावा लागेल. सुरक्षा उपायांचे पालन न करता होणाऱ्या सभांना प्रोत्साहन देण्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी बोलसोनारोविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोलसोनारो यांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधक नियमांचे पालन न करता देशाच्या मारान्हो येथे झालेल्या कार्यक्रमात भाग घेतला होता. आता देशाने दाखवून दिले आहे की, कायदा प्रत्येकास समान आहे.
मारान्हो येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष बोलसोनारो यांनी राज्यपाल डिनो यांना लक्ष्य करत त्यांना हुकूमशहा म्हटले आहे. ते म्हणाले की, राज्यपाल डिनो यांनी हुकूमशहाप्रमाणे कोरोनाविरूद्ध संरक्षक निर्बंध लादले आहेत. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे आणि सामाजिक अंतर पाळणे यासारख्या नियमांचा बोलसोनारो यांनी विरोध केला आहे. याशिवाय लॉकडाऊनलाही त्यांचा विरोध आहे. (हेही वाचा: Kim Jong-un यांचा नवा आदेश; उत्तर कोरियामध्ये Mullet Haircut, Ripped आणि Skinny Jeans, नाक व ओठ टोचण्यावर बंदी)
डिनो यांनी जनतेला आठवण करून दिली की, त्यांच्या राज्यात 100 हून अधिक लोक एकत्रित येण्यास बंदी आहे आणि फेस मास्क वापरणे बंधनकारक आहे. आता नियमांचे पालन न केल्याने बोलसोनारो कार्यालयाकडे अपील करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी आहे, त्यानंतर दंडाची रक्कम निश्चित केली जाईल. याबाबत अद्याप बोलसोनारोच्या कार्यालयाकडून कोणतीही माहिती अथवा प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना व्हायरस मृत्यूबाबत अमेरिकेनंतर ब्राझील हा जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे.