
पाकिस्तानातील (Pakistan) कराची (Karachi) येथे रात्री उशिरा झालेल्या बॉम्बस्फोटाने (Bomb Blast) परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूला उभी असलेली वाहने उद्ध्वस्त झाली. कराचीच्या सदर भागात हा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी बाजारपेठेत प्रचंड गोंधळ उडाला होता. प्राथमिक माहितीनुसार या बॉम्बस्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या तेराहून अधिक आहे. बॉम्बस्फोटानंतर सर्वत्र विध्वंसाच्या खुणा दिसत होत्या. अनेक वाहनांचेही नुकसान झाले. डस्टबिनशेजारी उभ्या असलेल्या एका सायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बॉम्बमध्ये 2 किलो स्फोटकांचा वापर
या बॉम्बस्फोटात सुमारे दोन किलो स्फोटके आणि सुमारे अर्धा किलो बॉल बेअरिंग्स वापरण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट टायमरने करण्यात आला. त्याच वेळी, सिंध आणि बलुचिस्तानच्या फुटीरतावादी गटांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कराची पोलिस याला दहशतवादी हल्ला म्हणत आहेत. (हे देखील वाचा: Sri Lanka: देशातील आर्थिक संकटांदरम्यान Ranil Wickremesinghe बनले श्रीलंकेचे नवे पंतप्रधान; पाचव्यांदा घेतली शपथ)
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या घटनास्थळावरून लोकांना हटवण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागी हा स्फोट झाला. त्यामुळे येथे मोठी गर्दी होत आहे. या भागाला डाउनटाउन म्हणतात. त्याचबरोबर स्फोटामुळे आजूबाजूच्या हॉटेल आणि घरांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.