'Bharat Vs India' Row: 'भारत विरुद्ध इंडिया' वादावर United Nations ची प्रतिक्रिया- 'नाव बदलण्याची विनंती आल्यास विचारात घेऊ'
United Nations (File Image)

सध्या भारतामध्ये देशाचे नाव बदलण्यावरून वाद सुरू आहे. या वादात सत्ताधारी आणि विरोधक दोन गटात विभागले गेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जी-20  डिनरच्या निमंत्रणात त्यांना 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे संबोधित केल्याने हा वाद वाढला आहे. आता या वादात संयुक्त राष्ट्राची (United Nations) प्रतिक्रिया समोर आली आहे. यूएनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, जेव्हा एखाद्या देशाकडून त्याचे नाव बदलण्याची विनंती केली जाते तेव्हा युएन ती विनंती विचारात घेते.

युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी बुधवारी तुर्कीने आपले नाव बदलून तुर्किये ठेवल्याचे उदाहरण दिले. देशाचे नाव बदलण्याच्या सर्व वृत्तांवरील प्रश्नाला उत्तर देताना फरहान हक म्हणाले, इंडियाचे नाव बदलून 'भारत' ठेवता येईल. याआधी आम्ही तुर्किये सरकारने केलेल्या औपचारिक विनंतीला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आम्हाला यापुढे अशा विनंत्या मिळाल्या तर आम्ही त्यांचा नक्की विचार करू.

जी-20 निमंत्रण मेजवानी व्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याच्या प्रेस नोटवरदेखील ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ लिहिले गेले होते, जी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी शेअर केली होती. जी-20 च्या भारतीय प्रतिनिधींच्या ओळखपत्रांवरही ‘भारत’ हा शब्द नमूद करण्यात आला आहे. (हेही वाचा: India Vs Bharat Row: 'भारत विरुद्ध इंडिया विषयावर फक्त अधिकृत व्यक्तीच बोलतील': PM Narendra Modi यांची मंत्र्यांना सुचना)

दरम्यान, केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने News18 ला सांगितले की, लवकरच विविध सरकारी योजना, सरकारी कार्यक्रम, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आमंत्रणे आणि सरकारी अधिकृत कागदपत्रांवर 'भारत' हे नाव दिसू शकते. 'कर्मयोगी भारत' सारख्या योजना आणि कार्यक्रमांचा भाग म्हणून 'भारत' हा शब्द पूर्वीपासून अधिकृत कागदपत्रांवर वापरला जात आहे.