India Vs Bharat Row: 'भारत विरुद्ध इंडिया विषयावर फक्त अधिकृत व्यक्तीच बोलतील': PM Narendra Modi यांची मंत्र्यांना सुचना
PM Modi | Twitter

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या 'सनातन धर्मा'बाबत केलेल्या वादग्रस्त विधानाला योग्य प्रतिसाद देण्याची गरज व्यक्त केली. तसेच त्यांनी मंत्र्यांना ‘इंडिया विरुद्ध भारत’ वादावर टिप्पणी करण्यापासून सावध केले आणि केवळ अधिकृत व्यक्तींनीच या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे, असे म्हटले.

नवी दिल्लीत जी20 शिखर परिषदेपूर्वी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांनी सल्ला दिला की, ‘ऐतिहासिक पैलूंचा शोध घेणे टाळा आणि घटनेच्या अनुषंगाने तथ्ये मांडण्यावर लक्ष केंद्रित करा. समस्येच्या समकालीन पैलूंवर लक्ष द्या.’

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांची तुलना केल्यावर राजकीय वाद पेटला आहे. शनिवारी चेन्नईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, ‘आपण अशा गोष्टींना विरोध करू नये, उलट त्यांचा नायनाट केला पाहिजे’, अशी टीका केली होती.

या वक्तव्यावर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपनेही काँग्रेसला त्यांच्या विधानांचा निषेध करण्याचे आवाहन केले. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये बुधवारी डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला. आता पंतप्रधान मोदींच्या वतीने मंत्र्यांना सनातन धर्म वादावर बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे. (हेही वाचा: Udhayanidhi Stalin On Sanatana Remark: उदयनिधी स्टॅलिन यांचा 'सनातन धर्म' वादावरुन पुन्हा हल्ला, दिले उदाहरणासह स्पष्टीकरण)

दरम्यान, भारताच्या अध्यक्षतेखाली 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत जी-20 शिखर परिषद आयोजित केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुख यात सहभागी होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  या 9 सप्टेंबर रोजी जी-20 डिनरचे आयोजन करणार आहेत. त्यांनी पाठवलेल्या निमंत्रणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'भारताचे राष्ट्रपती' म्हणून संबोधण्यात आले आहे. निमंत्रणात 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' लिहिण्याऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत’ लिहिण्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकार विरोधी आघाडी इंडियाला घाबरून देशाचे नाव बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा विरोधकांनी केला.