थोर असो किंवा कॅप्टन अमेरिका, मार्व्हलच्या सुपरहिरोकडे लोक वाईटाचा नायनाट करणारे नायक म्हणून पाहतात. आता पोलीस अधिकाऱ्यांनीही गुन्हेगारांना वेठीस धरण्यासाठी या महानायकांचा आधार घेतला आहे. पेरूमधील (Peru) चार पोलीस अधिकार्यांनी मार्व्हल फ्रँचायझी पात्रांच्या पोशाखात अंमली पदार्थ विक्रेत्यांवर छापा टाकला आणि त्यांना अटक केली. अशाप्रकारे मार्व्हल हिरोच्या गेटअपच्या मदतीने पोलिसांनी एका मोठ्या अंमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हॅलोवीन पार्टीत ड्रग्ज विक्रेते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या लोकांना पकडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी स्पायडर मॅन, कॅप्टन अमेरिका, थोर आणि ब्लॅक विडो सारख्या सुपरहिरोंची वेशभूषा अवलंबली. अंमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी सुपरहिरोच्या पोशाखात असलेले हे पोलीस अधिकारी हॅलोविनच्या उत्सवातील गर्दीत सामील झाले.
हॅलोवीन पार्टीच्या गर्दीतील मादक पदार्थांच्या तस्करांना पकडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी हे धाडसी पाऊल उचलले. या पोशाखात हे पोलीस अधिकारी पेरूच्या सर्वात हिंसक भागांपैकी एक असलेल्या सॅन जुआन डी लिरिगांचो येथे गेले आणि तस्करांच्या ठावठिकाणी छापे टाकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी छाप्यात गांजाच्या 127 बॅग, कोकेनच्या 287 बॅग, बेसिक कोकेन पेस्टचे 3,250 छोटे पॅकेज आणि कच्च्या कोका पानाचा अर्क जप्त केला. या छाप्यात पोलिसांनी तीन पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतले. (हेही वाचा: South Korea: दक्षिण कोरियाची राजधानी सेयूलमध्ये भीषण दुर्घटना! हॅलोवीन फेस्टीव्हमध्ये चेंगराचेंगरीत १४९ जणांचा मृत्यू)
एका मीडिया हाऊसने पोलीस कर्नल डेव्हिड विलानुएवाच्या हवाल्याने सांगितले की, ‘एका इमारतीत, एक संपूर्ण कुटुंब अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतले होते आणि जवळच्या उद्यानात ड्रग्ज विकले जात होते.’ डेली मेलमधील एका अहवालात असे म्हटले आहे की पेरूमध्ये एक किलो कोकेन पेस्टची किंमत सुमारे $380 (30 हजार रुपयांपेक्षा जास्त) आहे आणि एक किलो कोकेन हायड्रोक्लोराईडच्या शुद्ध स्वरूपाची किंमत सुमारे $1,000 (80 हजार रुपये) आहे.