ब्राझील मध्ये अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफर्ड (Oxford ) यांच्या प्रयत्नाने विकसित केलेल्या COVID-19 लसीच्या क्लिनिकल ट्रायल मधील एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ही माहिती देशाच्या आरोग्य यंत्रणेकडून बुधवार, 21 ऑक्टोबर दिवशी देण्यात आली आहे. यासोबतच देशामध्ये पुढे या लसीची चाचणी कायम सुरू राहील अशी माहितीदेखील देण्यात आली आहे. दरम्यान वैद्यकीय माहिती गोपनीय ठेवत इतर कोणत्याही बाबींवर खुलेपणाने बोलणं टाळलं आहे. COVID-19 Vaccine Update: जॉन्सन अॅण्ड जॉन्सन च्या कोविड-19 लसीच्या चाचण्यांना ब्राझीलमध्ये तात्पुरती स्थगिती.
कोविडच्या संभाव्य लसीच्या मानवी चाचणीत अशाप्रकारे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. काही दिवसांपूर्वी युके मध्ये एका स्वयंसेवकाला त्रास होत असल्याने काही काळ लसीची चाचणी थांबवण्यात आली होती मात्र नंतर पुन्हा सुरू झाली आहे. सध्या ब्राझील, भारत आणि साऊथ आफ्रिकेमध्ये लसीची मानवी चाचणी महत्त्वाच्या टप्प्यांत सुरू आहे.
अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड यांच्या लसीची अशाप्रकारे नकारात्मक बातमी समोर आल्याने आता ट्रेडिंगमध्ये त्याला फटका बसला आहे. 1% ने ते खालावले आहेत. दरम्यान अॅस्ट्राझेनेकाकडून मात्र याविषयी बोलणं टाळण्यात आलं आहे.
अमेरिकेमध्ये सध्या अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड यांच्या लसीच्या गंभीर परिणामांची तपासणी सुरू आहे. सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या या लसीचे आतापर्यंतचे निष्कर्ष हे सकारात्मक आहेत. भारतामधील सीरम इन्स्टिट्युट त्याच्या निर्मितीचे काम करत आहे. तर भारतामध्ये कोविशिल्ड या नावाने त्याच्या मानवी चाचण्या तिसर्या टप्प्यात सुरू आहेत.