Anil Soni (संग्राहिक संपादित प्रतिमा)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) मध्ये एका महत्त्वपूर्ण पदावर भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या डब्ल्यूएचओ फाउंडेशनचे (WHO Foundation) पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल सोनी (Anil Soni) यांच्या नावाची निवड झाली आहे. ही संस्था जगातील आरोग्यविषयक समस्यांबाबत डब्ल्यूएचओ बरोबर काम करेल. अनिल सोनी 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार आहेत. डब्ल्यूएचओ फाउंडेशनचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. या वर्षाच्या मेमध्ये याची सुरूवात झाली होती. डब्ल्यूएचओ फाउंडेशनमध्ये सामील होण्यापूर्वी अनिल सोनी हेल्थकेअर कंपनी व्हायट्रीज येथे ग्लोबल इंफेक्शन डीजीजचे प्रमुख होते.

डब्ल्यूएचओ 1 जानेवारी, 2021 पासून जागतिक आरोग्यासाठी निधी संकलनासाठी मोहीम राबवणार आहे. याची भिस्त अनिल सोनी यांच्यावर असणार आहे. 2023 पर्यंत अनिल यांच्यावर एक अब्ज डॉलर्स जमा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनिल सोनी यांच्या नव्या जबाबदाऱ्याबाबत डब्ल्यूएचओकडून निवेदनही आले आहे. डब्ल्यूएचओकडून सांगितले गेले आहे की, अनिल सोनी हे आरोग्य क्षेत्रातील नवीन प्रयोग आणि लोकांना निरोगी जीवनाकडे वळवण्यासाठी तसेच आणि नवीन प्रयोगांना प्रोत्साहन देणे व अशा मोहिमांचे नेतृत्व करतील.

फाउंडेशनवर मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांची नेमणूक करून निधी उभा करण्याचा डब्ल्यूएचओचा प्रयत्न आहे. यामुळे जर एखाद्या देशाने आपले योगदान कमी केले तर संस्थेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. अलीकडेच अमेरिकेने आपला निधी घटवला होता. मल्टीनेशनल फार्मा कंपनी व्हायट्रिसबरोबर आठ वर्षे काम केल्यानंतर अनिल सोनी, पुढच्या वर्षी जानेवारीत नवीन डब्ल्यूएचओ फाउंडेशनमध्ये सामील होतील.

सोनी म्हणाले की, ‘सध्या जग या जागतिक सार्वजनिक आरोग्याच्या सर्वात संकटमय टप्प्यातून जात आहे. कोविड-19 साथीचा बर्‍याच महिन्यांपासून संघर्ष केल्यानंतर आता कुठे जगासमोर काही आशा निर्माण झाल्या आहेत. आता जगातील काही देशांमध्ये कोविड-19 लसीकरण सुरू होत आहे. या लसांना यशस्वी मानले जात आहे. या संकटावर मात केल्यानंतर जगातील आरोग्याच्या रिकव्हरीसाठी पुढाकार घेण्यासाठी पैशांची गरज भासणार आहे. यावेळी एचआयव्ही आणि कर्करोगाच्या उपचारांमध्ये होणारा उशीर भरून काढण्यासाठीदेखील ही मदत उपयोगी पडेल.'

अनिल सोनी यांना आरोग्याच्या प्राथमिकतेसाठी निधी उभारण्याची उत्तम क्षमता असलेले तज्ञ म्हणून देखील ओळखले जाते. एचआयव्ही, टीबी आणि मलेरियाविरूद्ध सुरुवातीच्या मोहिमेसाठी अर्थसहाय्य मिळविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अनिल सोनी हे आरोग्य क्षेत्रातील अनेक दिग्गज संस्थांशी जोडले गेले आहेत.