( PC - PTI Representative image)

अमेरिकेने शनिवारी सकाळी बगदादमध्ये (Baghdad) पुन्हा एकदा हवाई हल्ला (Airstrike) केला आहे. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेने शुक्रवारी बगदादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी (General Qassem Soleimani) याच्यासह 8 जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेने आज बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ईराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबी याचा मृत्यू झाला आहे. हश्द अल शाबी हा ईराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे. या हवाई हल्ल्यात 2 वाहनांवर निशाणा साधण्यात आला. त्यामुळे या वाहनातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हश्द-अल -शाबी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप त्यास दुजोरा मिळालेला नाही. हल्ला करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये इराण समर्थक मिलिशिया हश्‍द अल-शाबीचे काही लोक असल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, असंही तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - World War 3: कोण होते जनरल कासिम सुलेमानी? ज्यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरुन अमेरिकी लष्कराने केले ठार)

या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये काही डॉक्टरांचाही समावेश असल्याचे 'अल जझिरा' वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. हा हल्ला ज्या ठिकाणी करण्यात आला त्या ठिकाणाहून काही अंतरावरच इटली आणि ब्रिटनच्या सैन्याचे तळ आहेत. अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले होते. कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता.