Air India Flight (PC - Wikimedia Commons)

भारतात दररोज लाखो लोक विमानाने प्रवास करतात, परंतु कधीकधी प्रवाशांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो, ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. विमान प्रवासादरम्यान सह प्रवाशांकडून होणाऱ्या वाईट वर्तनाच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, आता अलीकडेच 9 एप्रिल 2025 रोजी दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातूनही (Delhi-Bangkok Air India Flight) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. विमानात एका भारतीय प्रवाशाने त्याच्या जपानी सहप्रवाशाच्या अंगावर दारू पिऊन लघवी केल्याचा आरोप आहे. विमान बँकॉकला उतरण्यापूर्वी ही घटना घडली.

एअरलाइनने या प्रकरणाची पुष्टी केली आणि सांगितले की, क्रू मेंबर्सनी निर्धारित नियमांचे पालन केले आणि हे प्रकरण अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'फ्लाइट AI2336 मध्ये एका प्रवाशाच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार मिळाली होती. आमच्या पथकाने तात्काळ कारवाई केली आणि सर्व आवश्यक प्रक्रियांचे पालन केले. घटनेनंतर आरोपीला इशारा देण्यात आला. त्याच वेळी, पीडित व्यक्ती, जो एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले जाते, त्याला बँकॉकमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी मदत करण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याने ती नाकारली.

एअर इंडियाने पुढे म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल, जी आरोपीवर काय कारवाई करायची हे ठरवेल. या घटनेची दखल घेत, नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, याबाबत अधिकारी एअरलाइनशी बोलतील. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा मंत्रालय त्यांची दखल घेते. ते एअरलाइनशी बोलतील आणि जर काही गैरप्रकार आढळला तर आवश्यक ती कारवाई केली जाईल. (हेही वाचा: Woman Dies on IndiGo Airlines Flight: इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात महिलेचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आले विमानाचे इमर्जन्सी लँडिंग)

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानात अशी लज्जास्पद घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी असाच एक प्रकार समोर आला होता, जेव्हा शंकर मिश्रा नावाच्या एका पुरूषाने न्यू यॉर्क-दिल्ली विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी केली होती. त्यावेळी शंकर मिश्रा वेल्स फार्गो कंपनीत उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि अश्लीलतेचा गुन्हा दाखल केला होता. विमान कंपनीने त्याला 30 दिवसांसाठी विमान प्रवास करण्यास बंदी घातली.