सरकारची भन्नाट योजना; तिसरे अपत्य झाले तर भेट म्हणून मिळणार चक्क शेतजमीन
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Studio Bonon)

लोकसंख्येच्या  दृष्टीने भारताचा जगात 2रा क्रमांक लागतो. भारताचे क्षेत्रफळ आणि वाढत असलेली लोकसंख्या यांची सांगड घालता घालता सरकारची दमछाक होत आहे. इतक्या जास्त लोकसंख्येला सरकार मुलभूत गरजा देखील पुरवू शकत नाही. एकीकडे भारत लोकसंख्या नियंत्रणावर उपाययोजना राबवत आहे, तर दुसरीकडे इटलीमध्ये जन्मदर झपाट्याने घसरत आहे. क्षेत्रफळाचा विचार करता इटलीमध्ये अपेक्षित लोकसंख्या नसल्याची चिंता आता तिकडच्या सरकारला लागली आहे. यामुळेच आपल्या देशातील लोकसंख्या वाढावी म्हणून सरकारने तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या विवाहित जोडप्याला चक्क शेतजमिनीचा तुकडा भेट म्हणून देण्यात येणार असल्याची योजना आखली आहे.

युरोप या खंडामधील इटलीमध्ये जन्मदर सर्वात कमी आहे. त्यामुळे येथील राईट लीग पार्टीने तिसरे अपत्य जन्म बक्षीस प्रस्ताव सादर केला असून, तो आगामी बजेटमध्ये मांडला जात आहे. या प्रस्तावानुसार 2019 ते 2021 या काळात जोडप्याला तिसरे मुल झाले तर 20 वर्षाच्या करारावर त्यांना शेतजमीन दिली जाणार आहे. इटलीचे कृषी मंत्री जियान मार्को सॅंटिनियो यांनी ही घोषणा केली आहे.

मागील वर्षी इटलीमध्ये 4,64,000 बालकांची नोंद झाली आहे. युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत ही फारच कमी संख्या असल्याने इथल्या सरकारने ही भन्नाट योजना आखली आहे. मात्र ही योजना फक्त विवाहित जोडप्यांनाच लागू असेल. तसेच जी विदेशी जोडपी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ इटलीमध्ये राहिली आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.