जम्मू काश्मीर (Jammu-Kashmir) आणि लडाख (Ladakh) यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेल्यानंतर भारताकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या नकाशाला पाकिस्तान नंतर आता नेपाळनेही आक्षेप घेतला आहे. भारताने हा आक्षेप फेटाळून लावला आहे.
ह्या वादाचा मूळ मुद्दा आहे कालापाणी हा नेपाळच्या पश्चिमेला असणारा भाग. नेपाळचा हा भाग भारताच्या नकाशात भारताच्या हद्दीत दाखवण्यात आला आहे. याचा विरोध करत नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालय म्हणते,''कालापाणी अजूनही नेपाळचाच एक भाग आहे. त्यामुळे भारताने त्याला जे आपल्या हद्दीत दाखवले आहे, त्याला आमचा विरोध आहे. दोन्ही देशांचा उद्भवलेला हा सीमावाद परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर सोडवला जावा अशी अपेक्षा आहे.
नेपाळच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दरचूला जिल्ह्यात असलेला कालापाणी हा भूभाग भारतीय नकाशानुसार पिठोरगढ या उत्तराखंड मधील जिल्ह्यात दाखवण्यात आला आहे. (हेही वाचा. भारत देशाच्या नव्या नकाशावकरुन पाकिस्तान संतप्त)
या आरोपांना फेटाळत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले,''भारताचा सर्व प्रदेश अचूक दाखवण्यात आला आहे. नव्या नकाशानुसार भारत आणि नेपाळ दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.''
भारताने 370 कलम हटवलं. त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्यामुळे आता भारताला 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश मिळाले आहेत. या सर्व बदलांना समाविष्ट करण्यासाठी म्हणूनच भारताने काही दिवसांपूर्वी आपला नवा नकाशा जारी केला होता.