Meghan Markle and Prince Harry (Photo Credits: Twitter)

ब्रिटीश राजघराण्यातील वरिष्ठ पदावरून हटण्याची घोषणा करताना, प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल यांनी आपल्याला स्वावलंबी व्हायचे आहे असे सांगितले होते. आता पदावरून पायउतार झाल्यावर त्यांना अमेरिकन बहुराष्ट्रीय चेन बर्गर किंगकडून (Burger King) अर्धवेळ नोकरीची ऑफर देण्यात आली आहे. हॅरी आणि मेगन मार्कल यांनी काही दिवसांपूर्वी ब्रिटीश राजघराण्याचा वारसा सोडण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर 14 जानेवारी रोजी बर्गर किंगने आपल्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमधून त्यांना जॉब ऑफर देऊ केली. बर्गर किंगच्या या ट्वीटनंतर सोशल मिडीयावर या गोष्टीची बरीच चर्चा सुरु आहे.

प्रिन्स हॅरी हे राणी एलिझाबेथ -2 यांचे नातू, तसेच ते ब्रिटीश राज गादीसाठीचे सहाव्या क्रमांकाचे दावेदार आहेत. मे 2018 मध्ये त्यांनी अभिनेत्री मेगन मार्केलशी लग्न केले. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी या दोघांनी माध्यमांसमोर येऊन, आपण राजघराण्यातील ज्येष्ठ सदस्याच्या पदावरून पायउतार होत असून, आपली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची योजना असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी ते पुढे नक्की काय करतील याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर आता स्वावलंबी होण्यासाठी बर्गर किंगने त्यांना नोकरीची ऑफर दिली आहे. ‘हे हॅरी आमचा हा शाही परिवार आपल्याला अर्धवेळ नोकरीची ऑफर देत आहे’, अशा आशयाचे ते ट्वीट होते.

(हेही वाचा: प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी जाहीर केला लंडन राजघराण्यातील शाही पद सोडण्याची मानस; Buckingham Palace कडून आली 'ही' प्रतिक्रिया!)

अगदी काही क्षणातच ते ट्वीट प्रचंड व्हायरल झाले. या ट्वीटमुळे कंपनीने इंटरनेटवर लोकांची मनेदेखील जिंकली. या ट्वीटला आतापर्यंत जवळजवळ 7.5 हजार लोकांनी लाईक केले आहे, तर 1.8 हजार लोकांनी ते रिट्वीट केले आहे. दरम्यान राणी एलिझाबेथने आपला नातू प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांना त्यांच्या स्वतंत्र भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले आहेत. प्रिन्स हॅरी या आठवड्याच्या शेवटी कॅनडाला मेगनकडे परत जाण्याचा विचार करीत आहेत. दोघांनीही ब्रिटीश राजवट सोडण्याची घोषणा केल्यानंतर मेगन कॅनडाला परत गेली होती.