
अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचे (Taliban) राज्य आल्यानंतर देशातील निर्बंध इतके वाढले आहेत की, जनतेला इथे राहणे मुश्कील झाले आहे. दररोज तालिबान्यांच्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून खेळाचेही भवितव्य धोक्यात आले आहे. याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालिबान लष्कराने अफगाणिस्तानच्या ज्युनिअर महिला व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडूचा (Junior Volleyball Player) शिरच्छेद केला आहे.
ज्युनिअर महिला राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाने याबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांना माहिती दिली आहे. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, मेहजाबीन हकीमी (Mahjabin Hakimi) नावाच्या खेळाडूला ऑक्टोबरच्या सुरुवातीला तालिबानने ठार केले. तालिबानने या कुटुंबाला धमकी दिल्याने कोणीही याबद्दल काहीही बोलले नाही. अफगानिस्तानमध्ये अश्रफ गनी सरकार कोसळण्यापूर्वी महजबीन काबुल नगरपालिका व्हॉलीबॉल क्लब कडून खेळली होती. ती क्लबच्या स्टार खेळाडूंपैकी एक होती.
आता काही दिवसांपूर्वी तिचे विच्छेदित डोके आणि रक्तबंबाळ मान असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अफगाण महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षकांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये तालिबान्यांनी देशात पूर्ण नियंत्रण मिळवण्याआधी संघातील दोन खेळाडूच देशातून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. महजबीन हकीमी मागे राहिलेल्या इतर अनेक दुर्दैवी महिला खेळाडूंपैकी एक होती.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्यांनी, देशातील महिला खेळाडू ओळखून, त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यत्वे अफगाली महिला व्हॉलीबॉल संघाच्या सदस्यांच्या शोध घेतला जात आहे, ज्यांनी परदेशी आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
तालिबानने देश ताब्यात घेतल्यानंतर महिलांच्या अनेक हक्कांवर गदा आली आहे. अफगाणिस्तानमध्ये सर्व प्रकारच्या खेळांना व खेळाडूंना संकटाचा सामना करावा लागत आहे. संघाच्या प्रशिक्षकाच्या मते, महिला खेळाडूंची यावेळी सर्वात वाईट स्थिती आहे, कारण त्यांना देश सोडावा लागला आहे किंवा लपून राहावे लागले आहे. (हेही वाचा: China: मुलांच्या गैरवर्तवणूकीची शिक्षा मिळणार पालकांना, चीनमध्ये बनवला जात आहे नवा कायदा)
काही दिवसांपूर्वी फिफा आणि कातर सरकारने ने अफगाणिस्तानातून अनेक पुरुष आणि महिला खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढले होते. या सर्वांना काबूलहून कतारला नेण्यात आले, जेणेकरून ते तिथे सुरक्षित असतील.