Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु; तालिबानने गठीत केली 12 सदस्यांची समिती
Taliban. (Representational Image/ Photo Credit: PTI)

भारताशी जुने संबंध असणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) आता तालिबानी (Taliban) राजवटीचा आवाज आता ऐकू येऊ लागला आहे. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनही आपल्या ताब्यात घेतले आहे. राष्ट्रपती घनी हे कधीच देश सोडून पळून गेले आहेत व आता येथे हजारो लोक आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात इथे आता तालिबान आपली सत्ता स्थापन करत आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याला 10 दिवस झाले आहेत व सत्ता हस्तांतरणाच्या सर्व प्रक्रियाही पूर्ण होत आहेत. काही दिवसात तालिबान इथे आपले सरकार- इस्लामिक अमीरात सरकारची औपचारिक घोषणा करू शकतो.

अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार कसे असेल, असे प्रश्न उपस्थित होत आहे. आता माहिती मिळत आहे की, 12 सदस्यांची परिषद अफगाणिस्तान सरकार चालवणार आहे. या 12 पैकी 7 लोकांच्या नावांवर आधीच सहमती झाली आहे. स्पुतनिकने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या सात जणांमध्ये माजी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझई, राष्ट्रीय सलोख्यासाठी उच्च परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला आणि तालिबानचे सह-संस्थापक अब्दुल गनी बरदार यांचा समावेश आहे. परिषदेच्या उर्वरित पाच सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी चर्चा सुरु आहे.

तालिबान आणि अनेक प्रमुख अफगाण नेते पुढच्या सरकारबाबत चर्चा करत आहेत. तालिबानने आज, 24 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्या हालचालींची माहिती दिली. तालिबानने मंगळवारी आपल्या अंतरिम सरकारच्या अनेक मंत्र्यांची घोषणा केली. विशेष बाब म्हणजे संघटनेने एकेकाळी तालिबानचे कट्टर विरोधक असलेल्या गुल आगा शेरझाई यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

तालिबानने मुल्ला सखाउल्लाहला काळजीवाहू शिक्षण मंत्री आणि अब्दुल बारी यांना उच्च शिक्षण मंत्री म्हणून नियुक्त केले आहे. सदर इब्राहिम यांना अंतरिम गृहमंत्री करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुल्ला शिरीन यांना काबूलचे राज्यपाल आणि हमदुल्ला नोमानी यांना काबूलचे महापौर बनवण्यात आले आहे. (हेही वाचा: Afghanistan: काबुलमध्ये लोकांच्या बचावासाठी आलेल्या युक्रेनियन विमानाचे अपहरण; इराणला नेले असल्याची माहिती)

सध्या इथे काही सरकारी कार्यालयांमध्ये कामे सुरू झाली असून, काही अधिकाऱ्यांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. तसेच, उद्यापासून अफगाणिस्तानातील सर्व बँका उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सोमवारी तालिबानने परत एकदा अमेरिकेला 31 ऑगस्टपूर्वी देशातून आपले सैन्य परत घेण्याचा इशारा दिला आहे.