Afghanistan: अफगाण मुलींच्या विद्यापीठ शिक्षणावर बंदी; तालिबानने काढले नवे फर्मान
afghanistan (pic credit - afghanistan twitter)

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानची सत्ता काबीज करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या गेल्या एक वर्षामध्ये देशात नकारात्मकरित्या अनेक बदल घडले आहेत. तालिबान दररोज नवनवीन फर्मान काढून जनतेचे जिणे अवघड करत आहे. अशात मंगळवारी एक नवीन आदेश जारी करण्यात आला, ज्यामध्ये अफगाण मुलींच्या विद्यापीठीय शिक्षणावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली.

उच्च शिक्षण मंत्र्यांच्या पत्रानुसार तालिबानने अफगाणिस्तानातील मुली आणि महिलांसाठी चालवली जाणारी विद्यापीठे बंद करण्याची घोषणा केली आहे. उच्च शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी मंगळवारी स्वाक्षरी केलेल्या पत्रात पुढील सूचना मिळेपर्यंत महिलांचे विद्यापीठीय शिक्षण स्थगित करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे आपणा सर्वांना कळविण्यात येते, असे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर मुलींना फक्त शाळेत जाण्याची परवानगी देण्यात आली.

तीन महिन्यांपूर्वी, अफगाणिस्तानमधील हजारो मुली आणि स्त्रिया विद्यापीठांमध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला बसल्या होत्या. त्यानंतर लगेचच हा आदेश आला. या नव्या आदेशानंतर अफगाणिस्तानातील हजारो मुलींचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. यापूर्वी तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर महिला आणि मुलींच्या शिक्षणाबाबत फर्मान काढले होते. यामध्ये महिला व मुलींना पुरुषांच्या शाळेत शिकता येणार नाही, असे सांगण्यात आले. यासोबतच फक्त महिला शिक्षिकाच मुलींना शिकवू शकतील, असेही म्हटले होते. (हेही वाचा: इमरान खान यांचे 'सेक्स कॉल' प्रकरण वादात, महिलेने कथीतरित्या म्हटले 'माझा *** दुखतो आहे')

यासोबतच तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांना जिममध्ये जाण्यास बंदी घातली होती. एक वर्षापूर्वी तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून अनेक हुकूम महिलांच्या हक्कांवर आणि स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. तालिबानचा आणखी एक आदेश महिलांना पुरुष नातेवाईकसोबत असल्याशिवाय प्रवास करण्यास मनाई करतो. इतकेच नाही तर, जेव्हा महिला अँकर बातम्या वाचतील तेव्हा त्यांचे तोंड झाकले असावे.