अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानची राजवट सुरु झाल्यानंतर देशातील अनेक गोष्टी बदलल्या आहेत. सध्या इथे कोणाच्या भवितव्याची सगळ्यात जास्त काळजी वाटत असेल तर त्या आहेत इथल्या मुली. जसजसे तालिबान अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता बळकट करीत आहेत आहेत, तस तसे इथल्या मुलींच्या चिंतेचे भीतीत रूपांतर होऊ लागले आहे. आता इथल्या जनतेवर अशी परिस्थिती ओढवली आहे की, दोन वेळच्या जेवणासाठी कुटुंबांना आपल्या मुली विकाव्या लागत आहेत. नुकतेच एका हतबल बापाने आपली 9 वर्षांची लेक एका 55 वर्षाच्या व्यक्तीला विकली आहे.
अफगाणिस्तानच्या निर्वासितांच्या छावण्यांमध्येही खाण्या-पिण्याचे साधन संपत चालले आहे. उत्पन्नाचे काही साधन नसल्याने इथल्या कुटुंबांसमोर एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे, आपल्या मुली व्यापाऱ्यांना विकून पैसे उभा करणे. कोणतेच कुटुंब आपल्या मुलींचा असा व्यवहार करण्यासाठी धजावणार नाही, परंतु काळजावर दगड ठेऊन त्यांना हे करावे लागत आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, अलीकडेच एका वडिलांनी आपल्या 9 वर्षांच्या मुलीला 55 वर्षांच्या व्यक्तीला ‘वधू’ म्हणून विकले आहे.
मुलीला आपल्याला विकले आहे हे समजतही नव्हते. तिला जबरदस्तीने ओढून नेण्यात आले. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्यासाठी हे सोपे नव्हते, परंतु कुटुंबातील इतरांचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे करावे लागले. सासरी मुलीला मारहाण तर होणार नाही ना याची काळजी कुटुंबाला आहे. 8 जणांच्या कुटुंबातील एका मुलीची विक्री केल्यानंतर आलेल्या या पैशातून काही महिने पोटाची खळगी भरली जाईल. परंतु यामुळे मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. (हेही वाचा: भावाची क्रूरता! लहान बहिणी घरात करत होत्या गोंधळ, रागाच्या भरात त्याने दोघींना 8 व्या मजल्यावरून खाली फेकले; दोघींचाही मृत्यू)
मिररच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानातील मानवाधिकार संघटना चिंतित आहेत की संकट जसजसे वाढत जाईल, तसतसे तरुण मुलींची सौदेबाजी हा नित्याचा प्रकार होईल. याआधी अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जिथे लहान मुलींची विक्री केली गेली आहे. एक वडिलांनी तर आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला विकले होते. संयुक्त राष्ट्रालाही या मुलांच्या भविष्याची चिंता आहे.