Abu Dhabi Hindu Mandir: मागील महिन्यात अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सहभागी झाले होते. आता ते या आठवड्यात मुस्लिम देश यूएईची (UAE) राजधानी अबुधाबीमध्ये एका मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. गुलाबी वाळूच्या दगडाने बनलेले, मंदिर 27 एकरमध्ये पसरलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 14 फेब्रुवारी दरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनानुसार, 2015 पासून पीएम मोदींचा यूएईचा हा सातवा दौरा असेल. पंतप्रधान मोदी गेल्या आठ महिन्यांत तिसऱ्यांदा यूएईला भेट देत आहेत.
पीए मोदी हे 14 फेब्रुवारी रोजी अबू धाबीमध्ये उद्घाटनासाठी सज्ज असलेल्या देशातील पहिल्या हिंदू मंदिर- BAPS मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर अबुधाबी येथील झायेद स्पोर्ट्स सिटी येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील. पंतप्रधान मोदी युएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. युएई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.
दोन्ही नेते देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल, विस्तारित आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील. दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय होणार आहे. पंतप्रधान मोदी यूएईचे उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचीही भेट घेतील. त्यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी होतील. या परिषदेत पंतप्रधानही प्रमुख वक्ते असतील.
#WATCH | Visuals of the Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha (BAPS) Mandir, the first Hindu temple in Abu Dhabi.
Prime Minister Narendra Modi will inaugurate it on February 14. pic.twitter.com/l154agVh6J
— ANI (@ANI) February 12, 2024
युएईमधील पहिले मंदिर हे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था यांच्याद्वारे उभारले आहे. संस्थेचे स्वामी ईश्वरचरणदास आणि स्वामी ब्रह्मविहारीदास यांच्यासह एका शिष्टमंडळाने नवी दिल्लीत येऊन पंतप्रधान मोदींना उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केले. मंदिराच्या उभारणीत भारतीय समाजातील अनेक सदस्य आणि भाविकांचे योगदान आहे. अलीकडेच 35 हून अधिक देशांचे राजदूत आणि त्यांच्या जोडीदारांनी या मंदिराला भेट दिली. (हेही वाचा: Iran To Abolish Visa for Indian Citizens: भारतीय पर्यटकांना दिलासा! इराणमध्ये मिळणार व्हिसाशिवाय प्रवेश, जाणून घ्या सविस्तर)
पंतप्रधान मोदी ज्या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत ते भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे. हे मंदिर 15,000 चौरस मीटर परिसरात पसरले आहे. हे मंदिर इटालियन संगमरवरी बनलेले असून त्याची उंची 108 फूट आहे. या मंदिरात भगवान स्वामीनारायण, भगवान शिव, भगवान गणेश, भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधा यांच्या मूर्ती स्थापित आहेत. हे मंदिर हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतीक आहे आणि भारत व युएई यांच्यातील संबंध मजबूत करेल. या मंदिराच्या उभारणीसाठी 700 कोटींहून अधिक खर्च झाला आहे.