चीन: Coronavirus संक्रमित महिलेने दिला सुदृढ बाळाला जन्म
Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित 30 वर्षीय महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे स्त्री जातीचे हे बाळ अतिशय निरोगी आणि सुदृढ आहे. वृत्तसंस्था 'शिन्हुआ'ने दिलेल्या वृत्तानुसार ही महिला चीनमधील शान्शी प्रांताची राजधानी शिआन येथील आहे. शिआन येथील जियाओतोंग विद्यापीठातील 'सेकंड एफिलिएटिड हॉस्पिटल' मध्ये या महिलेची प्रसुती झाली. महिलेचे सिजेरियन करुन या बाळाला जन्म देण्यात आला. बाळाचे वजन 7,730 किलोग्रॅम आहे. ही महिला 37 आठवड्यांची गर्भवती होती.

बाळ आणि बाळंत महिला सध्या स्थानिक आरोग्य आणि वैद्यकीय सेवा पुरवठा विभागाच्या निगराणीखाली आहेत. दोघांचीही चांगल्या पद्धतीने देखभाल केली जात आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पुढच्या काही काळात महिलेची पुन्हा एकदा आरोग्य चाचणी केली जाईल. द हिंदू ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, चीनमध्ये घात अशा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तब्बल 1000 इतकी झाली आहे. तसेच, चीनमध्ये 42,000 पेक्षाही अधिक लोक कोरोना व्हायरसमुळे बाधीत झाल्याचे पुढे येत आहे.

जन्माला आलेल्या बाळाची डॉक्टरांनी काही वेळातच चाचणी केली. या चाचणीत बाळाला कोरोना व्हायरसची बाधा झाली नसून, ते सुरक्षीत असल्याचे चाचणीदरम्यान निष्पन्न झाले. स्थानिक आरोग्य विभागाने पुढे म्हटले आहे की, या विशिष्ठ कालावधीच्या फरकानंतर बाळाची वारंवार चाचणी केली जाईल. (हेही वाचा, Coronavirus: चीनमध्ये कोरोना व्हायरस ने घेतला 1000 च्या वर लोकांचा बळी; तर 40,000 हून अधिक या गंभीर आजाराच्या विळख्यात)

प्राप्त माहितीनुसार, संबंधीत महिलेला 7 फेब्रुवारी या दिवशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय चाचणीत या महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर तिला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले होते. दरम्यान, तिने मुलीला जन्म दिला.