Donald Trump: माझ्यावरील आरोप केवळ राजकीय हेतूने प्रेरित- डोनाल्ड ट्रम्प
Donald Trump| Wikimedia Commons

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या भरपाईच्या प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालं आहे. अशा प्रकारची नामुष्की ओढवलेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. दरम्यान ट्रम्प यांनी आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. आपल्यावर झालेले आरोप हे निंदनीय असून राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पॉर्न स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी दिलेल्या पैशांचं हे प्रकरण आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

ग्रँड ज्युरींनी गुरुवारी माजी राष्ट्रपतींवर आरोप ठेवण्यासाठी मतदान केले आणि ते आरोप सध्या सीलबंद करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशलमिडीयावरुन या आरोपांवर टिका केली आहे. या टिकेत त्यांनी अनेक अर्वाच्च शब्दांचा वापर देखील केला आहे.

स्टॉर्मी डॅनियलने दावा केला की, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘द अँप्रेटिस’ या रिॲलिटी शोमध्ये काम देण्याचा बहाणा करून तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. दरम्यान 2006 साली या दोघांचाही एकमेकांसोबतचा एक फोटो प्रसिद्ध झालेला आहे.