Pakistan Shocker: रुग्णालयातील डॉक्टरांनी 23 वर्षीय हिंदू महिलेला गुंगीचे औषध देऊन केला सामूहिक बलात्कार; पीडितेची प्रकृती चिंताजनक
Stop Rape | Representational Image (Photo Credits: File Image)

Pakistan Shocker: पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजातील एका महिलेवर अत्याचाराची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सिंध प्रांतातील रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी आलेल्या 23 वर्षीय रुग्णावर सामूहिक बलात्कार केला. किडनीच्या उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कारानंतर प्रकृती खालावल्याने तिला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी डॉक्टर आणि इतर कर्मचारी फरार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना सिंध प्रांतातील तांडो मुहम्मद खान शहरातील इंडस हॉस्पिटलच्या किडनी वॉर्डमध्ये घडली. पीडितेने सांगितले की, आरोपी डॉक्टरांनी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी घटनेची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पाडले. याआधीच आरोपी डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. (हेही वाचा -Terrorist Attack: नायजेरियातील मशिदीवर दहशतवादी हल्ला, अंदाधुंद गोळीबारात 9 जणांचा मृत्यू)

या घटनेने संतप्त झालेल्या पीडितेच्या कुटुंबीयांनी निदर्शने केली. ते म्हणाले की, अल्पसंख्याक हिंदू समाजातील महिला रुग्णालयातही सुरक्षित नाहीत. सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सामूहिक बलात्कारानंतर पीडितेच्या वक्तव्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तान डिफेन्स नावाच्या वेबसाईटने आपल्या रिपोर्टसोबत फराज परवेझची एक्स पोस्ट शेअर केली आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या दुरवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या फराजने आपल्या एक्स-पोस्टमध्ये पीडितेच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ती स्थानिक भाषेत या भीषण घटनेची माहिती देत ​​आहे.