अफगानिस्तान (Afghghanistan) देशाची राजधानी असलेल्या काबुल शहरात अमेरिकी दूतावास (US Embassy) कार्यालयाबाहेर रॉकेट ब्लास्ट (Rocket Blast) करण्यात आला आहे. या स्फोटामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच, कार्यालय आणि कार्यालयातील कर्मचारी आणि इतर लोक सुरक्षीत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तत्काळ प्रवेशबंधी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये घडलेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज (11 सप्टेंबर 2019) 18 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे या घटनेकडे विशेष सतर्कतेने पाहिले जात आहे.
काबुल शहरातून मध्यरात्री धुराचे लोट आकाशाच्या दिशेने झेपावताना पाहायला मिळाले. त्यानंतर काही वेळातच सायरनचे मोठमोठे आवाजही नागरिकांच्या कानी पडू लागले. त्यामुळे परिसरातील नागरिक काहीशा घाबरल्या अवस्थेत नेमके काय घडले याचा अंदाज घेऊ लागले. दरम्यान, अमेरिकी दूतावास कार्यालयाबाहेर रॉकेट स्फोट घडल्याची माहिती ध्वनीक्षेपकावरुन देण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर अफगानी अधिकाऱ्यांनी तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगानिस्तानमध्ये असलेल्या तालिबानींसोबत शातता संवाद रद्द करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. ट्रम्प यांच्या घोषणनेनंतर घडलेला हा पहिलाच मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकी सैनिकांसह 12 लोकांची तालिबान्यांनी हत्या केली होती. याच मुद्द्यावरुन ट्रम्प यांनी हा संवाद थांबवत असल्याचे म्हटले होते.