जपानच्या किनाऱ्यावरील 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवर आणखी 4 भारतीयांना कोरोना व्हायरसची लागण
Diamond Princess Cruise Ship | File Image | (Photo Credits: AFP)

चीनमध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. जपानच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या 'डायमंड प्रिन्सेस' (Diamond Princess) क्रूझवरील आणखी 4 भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे 4 जण क्रूझरवरील कर्मचारी आहेत. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे शनिवारी 109 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या विषाणूची लागण झालेल्याने दगावणाऱ्यांची संख्या 2 हजार 345 इतकी झाली आहे.

गुरुवारी या क्रुझवरील दोन वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला होता. या जहाजात अनेक भारतीय नागरिक अडकले असून आतापर्यंत यातील 12 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. या क्रूझवरील प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून ही क्रूझ योकिहामा बंदरावर उभी करण्यात आली आहे. (हेही वाचा - जपान: 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 2 वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू)

'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 600 पेक्षा जास्त प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या जहाजात 137 भारतीय अडकले आहेत. त्यातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या भारतीयांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रूझवरील सर्व प्रवाशांच्या वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत प्रवाशाला कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यास त्याला 14 दिवस वेगळं ठेवण्यात येत आहे. त्यानंतर त्याला आपल्या देशात जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.

12 भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने भारतीय दुतावास जपान सरकारच्या संपर्कात आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत 2 हजार 345 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 76 हजार 288 इतकी झाली आहे. चीनच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.