जपान: 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 2 वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू
Diamond Princess Cruise Ship | File Image | (Photo Credits: AFP)

जपान (Japan) किनारपट्टीवर उभ्या असलेल्या 'डायमंड प्रिन्सेस' (Diamond Princess) क्रूझवरील अनेक लोकांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. गुरुवारी या क्रुझवरील दोन वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. यात एका महिलाचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे दोन प्रवाशी जपानचे नागरिक होते. मागील आठवड्यामध्ये त्यांची क्रुझवरून सुटका करण्यात आली होती. परंतु, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या जहाजातील 79 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. या जहाजात अनेक भारतीय नागरिक अडकले असून यातील 7 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 621 वर गेली आहे. जपान सरकार क्रुझवर अडकलेल्या नागरिकांची चाचणी करून त्यांची सुटका करत आहे. मात्र, क्रुझवरील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूमुळे कोरोनाची लागण न झालेल्या क्रुझवरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा - Coronavirus : आईचा विमानातच मृत्यू; चीनमधून मृतदेह मुंबईत आणण्यासाठी 20 दिवसांपासून प्रतीक्षा, कोरोना व्हायरस करतोय मेहरा कुटुंबीयांची परवड, डॉ. मुलाचे पंतप्रधान मोदी यांना पत्र)

या जहाजावर एकूण 3,711 एकूण लोक आहेत. त्यापैकी 138 भारतीय आहेत. भारतीयांमध्ये 132 क्रू मेंबर्स आणि सहा प्रवाशांचा समावेश आहे. क्रूझवरील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. क्रूझवरील सर्व प्रवाशांच्या वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत प्रवाशाला कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यास त्याला 14 दिवस वेगळं ठेवण्यात येत आहे. त्यानंतर त्याला आपल्या देशात जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.