Hardeep Nijjar Murder Case: खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Nijjar) हत्येचा आरोप असलेल्या चार भारतीय नागरिकांना कॅनडातील न्यायालयाने जामीन मंजूर केला. करण ब्रार, अमनदीप सिंग, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग या चार आरोपी भारतीय नागरिकांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणाचा खटला सध्या ब्रिटीश कोलंबिया सुप्रीम कोर्टात चालवण्यात येत असून प्रकरणाची पुढील सुनावणी ही 11 फेब्रुवारीला होणार आहे. (हेही वाचा - Hardeep Singh Nijjar Murder Case: हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणी चौथ्या भारतीयास कॅनडामध्ये अटक)
हरदीप निज्जर यांची जून 2023 मध्ये सरे, ब्रिटिश कोलंबिया येथे हत्या करण्यात आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर भारत आणि कॅनडातील संबध चांगलेच ताणले गेले होते. भारताने कॅनेडाने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान भारताविरोधात कोणतेही पुरावे नसताना देखील कॅनडाने भारताविरोधात लावलेल्या आरोपानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टिका ही करण्यात आली होती.
कोण होता हरदीप सिंग निज्जर ?
निज्जर कॅनडाच्या सरे शहरात राहत होता. 1997 साली त्याने पंजाबहून कॅनडात वास्तवास सुरुवात केली होती. त्याठिकाणी त्याने प्लम्बरचे काम सुरु केले. कॅनडामध्येच लग्न करून स्थायिक झाला, त्याला दोन मुले आहेत. 2020 सालापासून तो सरे शहरातील गुरुद्वाराचा प्रमुख होता. निज्जरचे मूळ गाव हे पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील फिल्लोर तालुक्यातील भर सिंग पुरा हे आहे.