Wireless Brain Chip In Human: एलॉन मस्कची कंपनी Neuralink चे मोठे यश, पहिल्यांदाच मानवी मेंदूमध्ये बसवली चिप; फक्त विचार करून करू शकाल कामे
Elon Musk (Photo Credit: PTI)

Wireless Brain Chip In Human: अब्जाधीश आणि टेस्लाचे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांची स्टार्टअप कंपनी न्यूरालिंकने (Neuralink) पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. कंपनीद्वारे मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्याची पहिली चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा एलोन मस्क यांनी केली आहे. एलोन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीने हे यश मिळवले आहे. मस्क यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीमध्ये ही चीप लावण्यात आली आहे, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मस्कने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली.

न्यूरालिंकला गेल्या वर्षी यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडून मंजुरी मिळाली होती. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने गेल्या वर्षी मे महिन्यात मानवी मेंदूमध्ये चीप लावण्यास मान्यता दिली होती. आता एलॉन मस्क म्हणाले की, याचे सुरुवातीचे निकाल खूपच उत्साहवर्धक आहेत. न्यूरालिंकचे तंत्रज्ञान मुख्यत्वे लिंक नावाच्या इम्प्लांटद्वारे काम करेल. 5 नाण्यांच्या आकाराचे हे उपकरण मानवी मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संवादाचे माध्यम तयार करेल. एलॉन मस्क यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'या उपकरणाच्या मदतीने तुम्ही फक्त विचार करून फोन-कॉम्प्युटर आणि इतर कोणत्याही उपकरणावर नियंत्रण ठेवू शकाल.' (हेही वाचा: Richest Person on Earth: एलॉन मस्कला जोरदार झटका, जगातील श्रीमंतांच्या यादीत घसरण, पाहा अंबानी आणि अदानी कोणत्या स्थानावर?)

न्यूरालिंक हे एक स्टार्टअप आहे, जे प्रसिद्ध अब्जाधीश एलोन मस्क यांनी काही शास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्यासोबत 2016 मध्ये सुरू केले होते. न्यूरालिंक हे ब्रेन चिप इंटरफेस तयार करण्याचे काम करते, जे मानवी कवटीत रोपण केले जाऊ शकते. या चिप्सच्या मदतीने, चालणे, बोलणे किंवा पाहू न शकणारे अपंग लोक पुन्हा काही प्रमाणात चांगले जीवन जगू शकतील. चिपच्या मदतीने, न्यूरल सिग्नल संगणक किंवा फोनसारख्या उपकरणांमध्ये प्रसारित केले जाऊ शकतात.

एलोन मस्कच्या न्यूरालिंकला त्यांच्या पहिल्या मानवी चाचणीसाठी स्वतंत्र संस्थात्मक पुनरावलोकन मंडळाकडून भरती मंजूरी मिळाली आहे. याचा अर्थ आता न्यूरालिंक मानवी चाचण्यांसाठी लोकांना भरती करण्यास सक्षम असेल. कंपनीच्या मते मानवी रुग्णांवरील त्यांचा अभ्यास पूर्ण होण्यासाठी सुमारे 6 वर्षे लागतील.

दुसरीकडे, मस्कच्या या कंपनीला त्यांच्या चीपच्या चाचणीदरम्यान मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. कंपनीने यापूर्वी लॅबमध्ये प्राण्यांवर चिप चाचणी केली होती, ज्यासाठी कंपनीवर जोरदार टीका झाली होती. 2022 मध्ये कंपनीला अमेरिकेच्या केंद्रीय चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. चाचणी दरम्यान कंपनीने 1500 प्राणी मारल्याचा आरोप आहे, यामध्ये उंदीर, माकडे, डुक्कर इत्यादींचा समावेश आहे. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळून लावले होते.