येत्या 5 महिन्यांत सुरु होणार Whatsapp Pay; आता पैसे पाठवणे होणार आणखी सोपे
WhatsApp (Photo Credit: Lifewire)

WhatsApp Payment Service: गुगल पे, पेटीएम अशा पैसे पाठवण्यासाठी वापरात असणाऱ्या अॅपच्या लोकप्रियतेनंतर  व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) देखील या क्षेत्रात उतरत आहे. म्हणजेच आता लवकरच तुम्ही  व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे ट्रान्सफर करू शकणार आहात. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून UPI वापरायची परवानगी व्‍हॉट्‍सॲपला देण्यात आली आहे. Whatsapp Pay च्या यशस्वी चाचणीनंतर हे अ‍ॅप युजर्सना वापरण्यासाठी उपलब्ध होणार आहे. पुढील पाच-सहा महिन्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप भारतात Whatsapp Pay लॉन्च करणार आहे. यासाठी आधी 10 लाख युजर्संना चाचणी स्वरुपात Whatsapp Pay सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपला छोटे पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे. सुरुवातीला भागीदारीसाठी आयसीआयसीआय बँकेला अॅड करण्यात आले आहे, त्यानंतर अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अशा बँकांशी भागीदारी केली जाईल. मात्र यामुळे पेटीएमला आव्हान निर्माण होऊ शकते, त्यामुळे Whatsapp Pay मध्ये व्यवहार करताना कोणतीच सुरक्षा राहू शकत नाही कारण त्यात लॉग इन करण्याची गरज नाही, असा मुद्दा मांडला गेला आहे. (हेही वाचा: खोटी माहिती, अफवा रोखण्यासाठी WhatsApp ने सादर केले ‘चेकपॉइंट टिपलाइन’; असा करा वापर)

फेसबुकने याआधी WhatsApp Pay चे पायलट व्हर्जन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च केले होते, हे व्हर्जन 10 लाख युजर्सनी वापरले होते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचे अपडेटेड व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. यात सेटिंगमध्ये तुम्हाला एक नवीन टॅब मिळेल. ज्यात पेमेंटचा पर्याय देण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या बॅंक अकाऊंटचा वापर करुन युपीआयशी जोडू शकता. येथे तुम्हाला नवा ऑथेंटिकेशन पिन मिळेल. या नंतर तुम्ही यातून बॅंकेचे नाव सिलेक्ट करुन पेमेंट करु शकता. मात्र यासाठी दोन्ही युजर्सकडे हे पेमेंट फिचर असणे आवश्यक आहे.