खोटी माहिती, अफवा रोखण्यासाठी WhatsApp ने सादर केले  ‘चेकपॉइंट टिपलाइन’; असा करा वापर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर खोट्या बातम्यांशी चार हात करण्यासाठी, तसेच खोट्या बातम्यांचा प्रसार टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने ‘चेकपॉइंट टिपलाइन’ (Checkpoint Tipline) ही सुविधा मंगळवारपासून उपलब्ध करून दिली. या सेवेमुळे आपल्याला मिळालेली बातमी खरी आहे का खोटी याची पडताळनी युजर्स करू शकणार आहेत. यासंदर्भात फेसबुकने सांगितले, ‘भारतामध्ये ही सुविधा स्टार्टअप कंपनी ‘प्रोटो’ने उपलब्ध करून दिली आहे. ही टिपलाइन खोट्या बातम्यांचा डेटाबेस तयार करण्यासाठीही मदत करणार आहे’. सध्या ही सेवा इंग्रजी, हिंदी, तेलुगू, बंगाली, मल्याळम या भाषांसाठीच उपलब्ध असणार आहे.

यासाठी तुम्हाला येणारे मेसेजेस जे तुम्हाला खोटे वाटत आहेत, ते (+91-9643-000-888) या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावे लागतील. प्रोटोचे पडताळणी केंद्र तो मेसेज तपासेल आणि तुम्हाला तो मेसेज खरा की खोटा ते सांगेल. खोटी माहिती देणारी छायाचित्रे, व्हिडीओ लिंक, मजकूर यांची छाननी टिपलाइनद्वारे करता येईल. (हेही वाचा: चुकूनही WhatsApp वर हे काम करु नका, नाहीतर डिलिट होतील फोटो आणि चॅट)

गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅपमुळे अनेक खोटे मेसेजेस पसरवणे, अफवा पसरवणे यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक अनुचित प्रकारदेखील घडले आहेत. आता निवडणुकीच्या काळात असे काही घडू नये म्हणून फेसबुककडून हे पाऊल उचलले गेले आहे. यासाठी प्रोटो कंपनीला इतर काही कंपन्यांचेही सहाय्य मिळणार आहे.