इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने एक युजर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. या फीचरद्वारे आता तुम्ही पाठवलेले टेक्स्ट मेसेज एडीट (WhatsApp Message Edit) करू शकता. या फीचरच्या मदतीने यूजर्सला मेसेज पाठवल्यानंतरही एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. मात्र वापरकर्ते संदेश पाठवल्यानंतर केवळ 15 मिनिटांच्या आत तो संपादित करण्यास सक्षम असतील. हे फीचर अलीकडे वेब व्हर्जनसाठी बीटा टेस्टिंगसाठी जारी करण्यात आले होते. आता कंपनीने त्याचे अधिकृत रोलआउट जाहीर केले आहे.
व्हॉट्सअॅपने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही एखादा चुकीचा मेसेज पाठवता किंवा मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या लक्षात येते की तुम्ही चूक केली आहे किंवा संदेश पाठवल्यानंतर तुमचा विचार बदलता तेव्हा या नवीन फीचरद्वारे तुम्ही तुमचा पाठवलेला संदेश संपादित करू शकता. मात्र, मेसेज पाठवल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांतच यूजर्स मेसेज एडीट करू शकतील. तुम्ही हा मेसेज एडीट केला आहे याची समोरच्या व्यक्तीला माहिती मिळेल मात्र ते पूर्वीचा संदेश पाहू शकणार नाही.
सध्या मेसेजिंग अॅप तुम्हाला आधी पाठवलेले मेसेज डिलीट करण्याची परवानगी देतो, आता या नव्या पाठवलेला संदेश संपादित करण्याच्या सुविधेमुळे संपूर्ण संदेश पुन्हा लिहिण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर अॅपलसारखेच आहे. अॅपलने iOS 16 मध्ये मजकूर संदेश संपादित करण्याचा फीचर दिला आहे. अॅपल वापरकर्त्यांकडेदेखील संदेश संपादित करण्यासाठी 15 मिनिटे आहेत. आयफोन वापरकर्ते पाच वेळा संदेश संपादित करू शकतात. मात्र व्हॉट्सअॅपमध्ये किती वेळा मेसेज एडिट करता येईल याची माहिती मिळाली नाही. (हेही वाचा: व्हॉट्सअॅपमध्ये जोडले गेले नवे 'चॅट लॉक' फिचर; आता युजर्सचे प्रायव्हेट संभाषण राहणार आणखी सुरक्षित)
मेसेज एडीट करण्यासाठी वापरकर्त्यांना मेसेजवर दीर्घकाळ टॅप करावे लागेल. यानंतर एक पॉप-अप पर्याय दिसेल, ज्यामध्ये मेसेज एडीट करण्याचा पर्याय समाविष्ट आहे. या पर्यायाच्या मदतीने युजर्स मेसेज एडिट करू शकतील. व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर्स पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट या दोन्हींवर काम करतील.