Uber Charges: फोनमध्ये कमी चार्ज असलेल्या लोकांना उबर आकारते जास्त भाडे; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण
Representative image (Photo Credit- PTI)

लोकप्रिय कॅब कंपनी उबेरवर (Uber) आरोप आहे की, कॅब बुक करणाऱ्या व्यक्तीच्या फोनची बॅटरी कमी असेल तर कंपनी कॅबचे भाडे वाढवते. होय, ही बाब खूपच आश्चर्यकारक आहे परंतु बेल्जियन वृत्तपत्र Dernière Heure ने केलेल्या एका छोट्याशा अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. अहवालानुसार, डर्निएर ह्यूरेने ब्रुसेल्स शहरात हा अभ्यास केला आहे आणि या अभ्यासात दोन फोनने एकाच वेळी एकाच ठिकाणी राइडची विनंती केली होती.

या अभ्यासासाठी एक उबेर राईड अशा फोनवरून बुक केली ज्यामध्ये 12 टक्के बॅटरी होती, तर दुसरी राईड अशा फोनवरून बुक केली ज्यामध्ये 84 टक्के चार्जिंग होते. दोन्ही कॅब एकाच गंतव्यस्थानासाठी बुक केल्या गेल्या होत्या, परंतु 84 टक्क्यांच्या तुलनेत 12 टक्के चार्जिंग असलेल्या फोनवरून कॅब बुक करण्यासाठी आकारले जाणारे भाडे खूपच धक्कादायक होते.

84 टक्के चार्जिंग असलेल्या फोनवरून प्रवासासाठी 16.60 युरो (सुमारे 1497 रुपये), तर 12 टक्के चार्जिंग असलेल्या फोनवरून प्रवासासाठी 17.56 (सुमारे 1583 रुपये) शुल्क आकारण्यात आले आहे. म्हणजेच त्यामध्ये 6 टक्के, 86 रुपयांचा फरक होता. हा अहवाल समोर आल्यानंतर, फोनच्या बॅटरी लेव्हलवर कंपनी भाडे निश्चित करत असल्याचा स्वतःवर झालेला आरोप उबेरने फेटाळला आहे.

उबेरने Dernière Heure ला दिलेल्या निवेदनात सांगितले की, राइडची किंमत ही मागणीवर आधारित आहे, तर वापरकर्त्याच्या फोनच्या बॅटरी स्तरावर आधारित नाही. उबेरने पुढे सांगितले की, राईड्सची सध्याची मागणी आणि त्याला प्रतिसाद देऊ शकतील अशा ड्रायव्हर्सच्या पुरवठ्यावर त्याची किंमत ठरवली जाते. कंपनीने असा दावा केला आहे की, ट्रिपची किंमत ठरवण्यासाठी फोनची बॅटरी लेव्हल विचारात घेतली जात नाही. (हेही वाचा: Parag Agrawal यांच्यासह 3 माजी ट्विटर अधिकाऱ्यांनी एलोन मस्कवर दाखल केला खटला; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या)

उबेरवर, ट्रिपचे भाडे हे वापरकर्त्याच्या फोनच्या बॅटरी लेव्हलद्वारे आकारात असल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2016 मध्ये, कंपनीचे आर्थिक संशोधनाचे माजी प्रमुख कीथ चेन यांनी NPR ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, फोनची बॅटरी कमी असताना वापरकर्ते अधिक पैसे देण्यास इच्छुक असल्याचे उबेरला आढळले होते. मात्र त्यावेळीही कंपनीने आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते.