भारताचा लडाख (Ladakh) हा भाग चीनचा (China) असल्याचे दाखवल्याबद्दल ट्विटरने (Twitter) संसदीय समितीकडे लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे. ट्विटरने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, ही चूक 30 नोव्हेंबरपर्यंत सुधारली जाईल. 18 ऑक्टोबर रोजी पत्रकाराने लेहमधील वॉर मेमोरियलमधून ट्विटरवर थेट प्रक्षेपण केले तेव्हा, असे दिसून आले की या ट्विटर इंडियाने या ठिकाणचे लोकेशन 'रिपब्लिक ऑफ चायना' दाखवले. यानंतर सोशल मीडियावर ट्विटरचा मोठा विरोध झाला. त्याचवेळी केंद्र सरकारने ट्विटरला घडलेल्या प्रकरणाबाबत जाब विचारला होता.
आता लडाखला चीनचा एक भाग म्हणून दाखविण्याची चूक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने कबूल केली आहे. डेटा सुरक्षा विधेयकावरील संसदीय समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी लेखी यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. 28 ऑक्टोबर रोजी या विषयावर ट्वीटरद्वारे मिळालेले उत्तर संसदीय समितीने पुरेसे नसल्याचे सांगितले होते. याबाबत प्लॅटफॉर्मचे अधिकारी समितीसमोर हजर झाले होते.
Earning and maintaining the trust of the people on our service is of the utmost importance. Twitter remains committed to serving and protecting the public conversation and partnering with the Government of India: Twitter Spokesperson https://t.co/JpZHTXwPv1
— ANI (@ANI) November 18, 2020
मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, भारताच्या नकाशाचे भौगोलिक क्षेत्र चुकीचे दाखवल्याबद्दल, ट्विटर इंकने त्यांचे मुख्य गोपनीयता अधिकारी डॅमियन कॅरियन यांनी स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र दिले आहे. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना लेखी म्हणाल्या की, ट्विटरने लडाखला चीनचा भाग दाखवल्याने भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली आहे.
केंद्र सरकारच्या संसदीय समितीने 22 ऑक्टोबर रोजी ट्विटर इंडियाला एक पत्र लिहून ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांना भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि भारतीयांच्या भावनांचा आदर करण्यास सांगितले होते. ट्विटरकडून घडलेली चूक ही सहनशीलतेच्या बाहेर असल्याचाचे सरकारने सांगितले होते. समितीचे अध्यक्ष मीनाक्षी लेखी यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, लडाखला चीनचा भाग दाखवणे देशद्रोह मानले जाईल आणि त्यासाठी सात वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा आहे. आता ट्विटरने याबाबत लेखी माफी मागितली आहे.