नोटबंदीनंतर भारतात व्यवहारासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग होण्याचे प्रमाण अतिशय वाढले. आजकाल लाईट बिल भरण्यापासून ते लाखो रुपये ट्रान्सफर करण्यासाठी सर्रास विविध अॅप्सचा वापर केला जातो. पेटीएम (Paytm) ने या डिजिटल पेमेंट विश्वात क्रांती आणल्यानंतर गुगलचे गुगल पे (Google Pay) बाजारात दाखल झाले, आणि आता या स्पर्धेत ट्रू कॉलर (Truecaller)चे ट्रू कॉलर पे (Truecaller Pay) देखील सामील झाले आहे. मार्च 2019 पर्यंत Truecaller Pay चे 2.5 कोटी वापरकर्ते असतील असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार दररोज तब्बल 1 लाख लोक आपले बँक खाते ट्रू कॉलरशी लिंक करत आहेत. यापैकी जवळजवळ 50 टक्के नवीन लोक ट्रू कॉलर पेचा वापर करताना दिसून येत आहेत.
याबाबत ट्रू कॉलर पेचे उपाध्यक्ष सोनी जॉय म्हणतात, ‘ट्रू कॉलर पे बाजारात आल्यापासून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे, यामुळेच आम्ही पेमेंट प्लॅटफॉर्म मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ग्राहकांना संतुष्ट ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल, म्हणून या अॅपवर आम्ही नवीन वेगवेगळी फीचर्स घेऊन येण्याच्या तयारीत आहोत.’
ट्रू कॉलर पे ने एनपीसीआयच्या भारत बिल पेमेंट सिस्टीम (Bharat Bill Payment System) शी करार केला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक या गोष्टीचा फायदा घेऊ शकतील. ट्रू कॉलर अॅपचा वापर जगभरात फोन नंबरची माहिती मिळविण्यासाठी केला जातो. मात्र, आता कंपनीने भारतात या अॅपच्या माध्यमातून पेमेंट सर्व्हिस देण्यास सुरुवात केली आहे. सध्या डिजिटल मार्केटमध्ये गुगल पे आणि पेटीएम यासारखे अॅप्स जास्त लोकप्रिय आहेत. आता ट्रू कॉलर यांना टक्कर देताना दिसून येईल.