Japan: वृद्धांची मोठी लोकसंख्या आणि घटत्या जन्मदरासाठी जपान ओळखला जातो. मात्र, आता हाच घटता जन्मदर(Birth Rate) जपाननची समस्या ठरत आहे. त्यावर उपाय काढण्यासाठी टोकियो प्रशासनाने कंबर कसली आहे. जपानमध्ये जन्मदर वाढवण्यासाठी (Increase Birth Rate )टोकियो प्रशासन स्वतःचे डेटींग ॲप(Dating App) लॉन्च करणार आहे. हा उपक्रम देशाच्या घटत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, जो सलग आठव्या वर्षी सरकारकडून विविध मार्गांनी राबवला जात आहे.
इंडिया टुडेच्या ने दिलेल्या माहितीनुसार, जन्मदर वाढवण्यासाठी डेटिंग ॲप लाँच करण्यात येणार आहे. ज्यात नागरिकांना त्यांच्याविषयीची मुलभूत माहिती देणे गरजेचे आहे. नवीन ॲप वापरकर्त्यांना कायदेशीररित्या अविवाहित असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. लग्न करण्यास इच्छुक असल्यांना गरजेच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारे प्रमाणपत्र किंवा सॅलरी स्लिप द्यावी लागणार आहे. ॲपमध्ये वापरकर्त्याची ओळख पटवून देण्यासाठी मुलाखत देणे अनिवार्य आहे. जी कदाचित अॅपमध्ये समाविष्ट केली जाईल. जपानच्या घटत्या जन्मदरांवर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी चिंता व्यक्त केली. 'घटत्या जन्मदराची प्रवृत्ती ही आपल्या देशाला भेडसावणारे सर्वात मोठे संकट' असल्याचे ते म्हणाले.
जपानची लोकसंख्या 2070 पर्यंत अंदाजे 30 टक्क्यांनी घसरून 87 दशलक्ष होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि जन्मदर वाढवण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. सरकारने आपल्या अलीकडच्या अर्थसंकल्पात जन्मदर सुधारण्यासाठीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी निधीची तरतूद देखील केली आहे.
मोबाइल ॲप्सद्वारे विवाह-प्रोत्साहन प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी प्रशासनाने 2023 च्या बजेटमध्ये 200 दशलक्ष येनची तरतूद केली होती. या वर्षी तर तो वाढवून 300 दशलक्ष येन पर्यंत नेला आहे. SpaceX चे CEO आणि X चे मालक इलॉन मस्क यांनी देखील जपानच्या घटत्या जन्मदरावर चिंता व्यक्त केली होती. तर सरकारकडून जन्मदर सुधारण्यासाठई राबवण्यात येणाऱ्या तरतूदींचे कौतुक केले होते.