SBI एटीएम कार्ड, पॅनकार्ड, ITR (PC - File Photo)

नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी अगदी काही दिवसांचा कालावधी उरला असून लवकरच 2019 या वर्षाची सांगता होणार आहे. नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर सरकार काही नवीन नियम लागू करत असते. त्यामुळे मागील नियम 31 डिसेंबरपर्यंतच लागू असतात. तसेच अनेक अशी कामे असतात ज्यासाठी सरकार 31 डिसेंबरची मुदत देत असते. त्यामुळे तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी 4 महत्त्वाची कामे केलेली आहेत की, नाही याची खात्री करा. ही महत्त्वाची कामे नेमकी काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. चला तर मग जाणून घेऊयात या महत्त्वाच्या कामांविषयी...

नवीन वर्षाची सुरुवात होण्याअगोदर बँका तसेच सरकर विविध नियम लागू करते. त्यामुळे नागरिकांना या नियमांची पुर्तता करावी लागते. अन्यथा संबंधित नागरिकांना मोठा तोटा होण्याचीही शक्यता असते. (हेही वाचा - PAN-Aadhar Link: 31 डिसेंबरपर्यंत पॅनकार्ड आधारकार्डसोबत लिंक करा; अन्यथा होईल मोठं नुकसान)

31 डिसेंबरपूर्वी करा ही 4 कामे -

SBI एटीएम कार्ड -

जर तुम्ही स्टेट बँकेचे खातेदार असाल आणि तुमच्याकडे बँकेचे जुने एटीएम कार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तुमच्याकडे SBI चे जुने मॅग्नेटिक कार्ड असेल तर, तुम्ही हे कार्ड बँकेच्या शाखेत जाऊन बदलून घ्या. तुम्ही जर कार्ड बदललं नाही, तर 31 डिसेंबर 2019 नंतर जुन्या एटीएम कार्डच्या साह्याने तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत. 31 डिसेंबरनंतर तुमच्याकडे नवे एटीएम कार्ड असणं आवश्यक आहे.

पॅनकार्ड -

केंद्र सरकारने पॅनकार्ड-आधारकार्डशी लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 ही अंतिम मुदत दिली आहे. याअगोदरदेखील सरकारने पॅन-आधारकार्ड लिंक करण्यासाठी मुदत वाढवली होती. आयकर तसेच त्यासंबंधिच्या सर्व सेवा मिळविण्यासाठी लवकरात-लवकर आपले पॅनकार्ड आधारकार्डशी जोडून घ्या. तुम्ही पॅन-आधारकार्डची जोडणी केली नाही तर 31 डिसेंबरनंतर तुमचं पॅनकार्ड अवैध ठरू शकतं.

प्राप्तिकर विवरण पत्र (ITR) -

तुम्ही 2018-19 या आर्थिक वर्षातील प्राप्तिकर विवरण पत्र (ITR) भरले नसेल तर यासंबंधी होणारा दंड टाळण्यासाठी 31 डिसेंबरपूर्वी प्राप्तिकर विवरण पत्र भरा. 31 डिसेंबर 2019 पूर्वी प्राप्तिकर विवरण पत्र भरल्यास 5 हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे. परंतु, तुम्ही 31 डिसेंबर 2020 पर्यंत प्राप्तिकर विवरण पत्र भरले, तर 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळे लवकरात-लवकर प्राप्तिकर विवरण पत्र भरा.

लवादाकडील विषय -

तुम्हाला सर्व्हिस टॅक्स किंवा एक्साईज ड्युटी यासंदर्भाच कोणतीही तक्रार लवादाकडे नोंदवायची असेल, तर ती 31 डिसेंबरच्या अगोदर नोंदवा. यासाठी अर्थ मंत्रालयाने एक नवी योजना सुरू केली आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 2019 ही नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली आहे.